कोरोनाकाळात जिल्ह्यातील केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:05+5:302021-03-24T04:34:05+5:30

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअँपच्या माध्यमातून उपक्रम, विद्यार्थ्यांची पाठ धुळे - इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या ...

During the Corona period, only 38% of the students in the district studied on their own | कोरोनाकाळात जिल्ह्यातील केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवर अभ्यास

कोरोनाकाळात जिल्ह्यातील केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवर अभ्यास

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअँपच्या माध्यमातून उपक्रम, विद्यार्थ्यांची पाठ

धुळे - इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या स्वाध्याय उपक्रमाकडे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांनीच स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी केली आहे. या उपक्रमात जिल्ह्याची १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे. यापूर्वी उपक्रमाच्या १३ व्या आठवड्यात मात्र जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता.

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवलेला अभ्यासक्रम विध्यार्थ्यांना किती समाजला, हे जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय उपक्रम राबवला जातो आहे. ३ नोव्हेंबर २०२० पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची व्हाॅट्सॲपवर नोंदणी करण्यात येते. नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांना विषयनिहाय प्रश्न प्राप्त होतात. यात मराठी, विज्ञान, गणित व इंग्रजी आदी विषयांचा समावेश आहे. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो. प्रश्न सोडवल्यानंतर लगेच किती गुण मिळाले ते समजते. अशापद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते आहे. तसेच शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांची प्रगती समजते. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न प्राप्त होतात. ग्रामीण भागात मोबाईलची अडचण व शहरी भागातील शिक्षक व खासगी शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे या उपक्रमात पिछाडीवर पडल्याची माहिती आयटी शिक्षक प्रणव पाटील यांनी दिली.

मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम -

स्वाध्याय उपक्रमासाठी जिल्ह्यातील मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मराठी माध्यमाच्या १ लाख ३० हजार ६६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या २१ हजार ९९६ व उर्दू माध्यमाच्या ४ हजार १३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तेराव्या आठवड्यात होता तिसरा क्रमांक -

३ नोव्हेंबर २०२० रोजी स्वाध्याय उपक्रमाची सुरुवात झाली होती. या उपक्रमाचा सध्या १९ वा आठवडा सुरू आहे. आठवड्यात किती विद्यार्थ्यांची नोंदणी झाली यावरून क्रमवारी ठरवली जाते. सध्या जिल्ह्याची पिछेहाट झाली असली, तरी तेराव्या आठवड्यात मात्र धुळ्याने तिसरा क्रमांक पटकावला होता.

विद्यार्थी म्हणतात -

* मी इयत्ता दहावीत आहे. स्वाध्याय उपक्रमात येणारे प्रश्न दर आठवड्याला सोडवत आहे. प्रश्न सोडविल्यानंतर किती प्रश्न बरोबर व किती चूक आले ते समजते. लगेच गुण समजत असल्याने प्रगती समजण्यास मदत होते.

- सानिया पिंजारी, कुसुंबा, ता. धुळे

* स्वाध्याय उपक्रमात नोंदणी केली आहे. प्रत्येक आठवड्यात आलेले प्रश्न सोडवतो. तसेच किती गुण मिळाले, याची माहिती शिक्षकांना देतो. स्वाध्याय उपक्रमामुळे अभ्यासात सातत्य राखण्यास मदत होत आहे.

- रोहन शिंदे, कुसुंबा, ता. धुळे

Web Title: During the Corona period, only 38% of the students in the district studied on their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.