धुळे जिल्ह्यात पावसामुळे मुग, उडीदची खरेदी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:29 IST2019-11-05T11:29:18+5:302019-11-05T11:29:36+5:30
खरेदीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के असणे गरजेचे

धुळे जिल्ह्यात पावसामुळे मुग, उडीदची खरेदी रखडली
आॅनलाइन लोकमत
धुळे :नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी भावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या धान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने, मुग,उडीदची अद्याप खरेदी सुरू झालेली नाही, अशी माहिती जिल्हा मार्केटींग कार्यालयातून देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मालाला हभी भाव मिळावा यासाठी २०१९-२० या हंगामासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात धुळे, शिरपूर व दोंडाईचा या तीन ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. शासनाने यावर्षी मुगाला ७ हजार ५०, उडीदला ५७०० तर सोयाबीनला ३७१० रूपये प्रति क्विंटल भाव जाहीर केलेला आहे.
नोंदणी सुरू होऊन जवळपास १५-२० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप मुग,उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही.
मुग, उडीद, सोयाबीन खरेदी न होण्यास सतत सुरू असलेला पावसाचे कारण आहे. यावर्षी सुरवातीपासूनच पाऊस चांगला असल्याने, मुग, उडीदाचे उत्पन्न चांगले आलेले आहे.
हमी भावाने मुग,उडीद खरेदी करण्यासाठी त्यात आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के असणे गरजेचे आहे. मात्र यावर्षी संततधार सुरू असल्याने, मुग, उडीदामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या धान्याची शासकीय केंद्रावर खरेदी सुरू होऊ शकलेली नाही, अशी माहिती देण्यात आली.
गेल्यावर्षीही जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली होती. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी सुरू असून शेतकरी आता उघडीपची वाट पहात आहे.