हॉटेल्स बंदमुळे आरोग्यवर्धक फळांच्या आहाराला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:38 IST2020-05-25T21:38:06+5:302020-05-25T21:38:25+5:30
दर सामान्य : आंबे, कलिंगड, डाळींबसह सफरचंदची मागणी वाढली

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : उन्हाळ्याला सुरुवात होताच आंबे, टरबूज, डांगर आदी उन्हाळी फळे बाजारात दाखल झाली आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पावले शहरातील फळ बाजाराकडे वळत आहेत. फळ विक्रीत वाढ झाली असून विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डाळिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आठ दिसांपूर्वी १०० रुपये किलो असलेले डाळिंबाची आता १४० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सातारा, सांगली, सांगोला येथून डाळिंबाची आवक होते आहे. द्राक्षांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या भावात घसरण दिसून येते आहे. १२० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे तासगावचे लांब द्राक्ष सध्या ८० ते ते १०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. तर नाशिकच्या गणेश द्राक्षांची ४० ते ६० रुपये प्रमाणे विक्री होते आहे. सफरचंद भाव खात असून २०० रुपयांप्रमाणे त्यांची विक्री होत आहे तर काश्मीर येथून येणारे सफरचंद १०० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे.
डांगर, टरबूज यांसारखी उन्हाळी फळे बाजारात मोठ्या प्रमाणावर येत आहेत़ छत्तीसगड येथील रायपूर येथून त्यांची आवक होत असून २५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. तर नागपूर येथून दाखल झालेले डांगर ३० ते ४० रुपयांना विकले जात आहे. तसेच शहाळ्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
नागपूर व पंजाब येथून संत्र्यांची आवक होत असून ५० ते ६० रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री होत आहे. लालबाग व बदाम जातीचे आंबे बाजारात येत आहेत़
लॉकडाउनमध्ये माल वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर फळांची आवक वाढली आहे़ दर सामान्य असल्याने ग्राहकांनाही परवडत आहे़