बिल थकल्याने, पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:42+5:302021-09-03T04:37:42+5:30
नेर येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ४० लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा ...

बिल थकल्याने, पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित
नेर येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ४० लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जोपर्यंत ग्रामपंचायत थकीत वीज बिल भरत नाही तोपर्यंत वीज पुरवठा सुरू होणार नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे सुमारे १ कोटी रुपये थकीत असल्याने ग्रामस्थांनी त्वरित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरावी, असे आवाहन केले आहे. यंदा पावसाची ओढ आणि कोरोनामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे १ कोटीची घरपट्टी आणि पाणीपट्टी लगेच वसूल होणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आता काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
योग्य मार्ग काढून नियोजन करू
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे ४० लाख रुपये वीज बिल थकीत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असली तरी मागील पदाधिकाऱ्यांनी हे वीज बिल भरणे आवश्यक होते. यातून योग्य मार्ग काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
गायत्रीदेवी जयस्वाल, सरपंच, नेर