मद्यपी महिलेचा महामार्गावर धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:22 IST2021-03-15T20:22:00+5:302021-03-15T20:22:37+5:30
नरडाणा टोलनाकाजवळील घटना, पोलिसाची कॉलर पकडली

मद्यपी महिलेचा महामार्गावर धिंगाणा
धुळे : नरडाणा टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी भर रस्त्यात दारु पिवून महिलेसह एका पुरुषाने धिंगाणा घातला. त्यांची विचारपूस करणाऱ्या पोलिसांचीच कॉलर पकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुने टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शितलच्या पुढे अलका किशोर पाटील (४०, रा. डोंगरे महाराज नगर, पारोळा रोड, धुळे) आणि महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील (३१, रा. हतनूर ता. शिंदखेडा) हे दोघे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधळ घालत होते. त्यामुळे उपनिरीक्षक शरद पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यावेळेस त्या महिलेसह पुरुषाने शिवीगाळ करीत रस्त्यावर धाव घेतली. पोलिसांनी रोखले असता थेट त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.