फास्टॅग बाबत चालकांमध्ये संभ्रम कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:40 IST2019-12-17T23:36:22+5:302019-12-17T23:40:01+5:30
५५ टक्के वाहन चालक झालेत गो फास्ट

Dhule
चंद्रकांत सोनार ।
धुळे : टोल नाक्यावरील वाहनांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहनांचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यावर फास्टॅगची सुविधा सुरू केली आहे़ आतापर्यत मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक करणाऱ्या धुळ्यातील स्थानिक ५५ टक्के वाहन चालक या प्रणालीद्वारे प्रवास करीत आहे़ तरीसुद्धा अद्याप वाहन चालकांना फास्टॅग बाबत पाहिजे तेवढी जनजागृती झाली नसल्याने ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यात १ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली लागू केली होती़ मात्र बहूसंख्य टोल नाक्यावरील यंत्रणेचे कामकाज पूर्ण नसल्याने १५ डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती़ दरम्यान, यासंदर्भात धुळे शहरातील अवधान येथील टोल नाक्यास ‘लोकमत’च्या टीमने प्रत्यक्ष भेट दिली असता त्याठिकाणी फास्टॅगला मुदतवाढ दिल्याने दोन दिवसापासून लागणारी वाहनांची रांग दिसली नाही. मात्र नाक्यावर जी वाहने उभी होती. त्यापैकी केवळ सुमारे ५० टक्के वाहनेच फस्टॅगचा वापर करतांना दिसून आली. उर्वरित ५० टक्के वाहने मात्र रोख रक्कम जमा करुन जातांना दिसली.
अनेक यासंदर्भात अनभिज्ञ
रोख रक्कम भरणाºया वाहनांमध्ये ट्रक चालकांचा अधिक समावेश होता. त्यापैकी काही चालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी फस्टॅग बाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचे कबूल केले. यामुळे दोन दिवसात खूप त्रासही झाल्याचे मान्य केले. मुदतवाढ मिळाल्याने आपण एक महिन्यात याबाबत माहिती घेऊ असेही काहींनी सांगितले.
रिचार्जच्या बाबत संभ्रमावस्था
काही कार चालकांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, फस्टॅग बाबत माहिती आहे. पण ते रिचार्ज कुठून करायचे तसेच त्याचे पेमेंट कसे करावे, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे यापासून लांबच रहावे, असे वाटते, अशी प्रतिक्रीया पुणे येथून आलेल्या श्रीकांत पटनायक यांनी दिली.
सरकारी वाहनांची बसविले टॅग
शासनाने सरकारी तसेच खाजगी वाहनांना फास्टॅगची सक्ती केली आहे़ त्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मनपा, जिल्हा पोलीस, राज्य परिवहन महामंडळ अशा विभागांना पत्राव्दारे फास्टॅग लावण्याचे आदेश दिले आहे़ त्यानुसार बहूसंख्य वाहनांना मुदतीत फास्टॅग लावण्यात आले आहे़ मात्र बहूसंख्य खाजगी वाहनांना अद्याप फास्टॅग लावण्यात आलेले नाही़ त्यामुळे १५ डिसेंबर रोजी सोनगीर, अवधान टोलनाल्यावर ही यंत्रणेची चाचणी घेण्यात आली होती़ मात्र लेनचे नियोजन नसल्याने टोलनाल्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ फास्टॅग लावण्यासाठी शासनाने तिसऱ्यांदा ३१ जानेवारीपर्यत मुदत दिली आहे़ आहे़ त्यासाठी ३१ जानेवारीपर्यत टोल नाक्यावरील कॅश काऊंटर सुरू ठेवले आहे़ वाहनाला फास्टॅग लावण्यासोबतच फास्टॅग वॉलेटमध्ये रक्कम ठेवणे गरजेचे आहे़