मालपूर परिसरात दुबार पेरणींना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:31+5:302021-07-31T04:36:31+5:30
हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार ...

मालपूर परिसरात दुबार पेरणींना सुरुवात
हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार येथे आगमन झाले. या पावसाच्या भरवशावरच शेतकर्यांनी खरिपातील पेरणीची कामे व कोरडवाहू कापूस लागवड पूर्ण केली. मात्र तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे केलेल्या पेरण्या वाया गेल्या. सध्या येथील शेतकर्यांना दुबार पेरणीच्या कामांना सामोरे जावे लागत आहे. तर कापसाचीदेखील हीच गत झाल्यामुळे नव्याने कापूस लागवड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दुबार पेरणीमुळे येथील शेतकरी भांडवलासाठी आर्थिक चणचणीत सापडला आहे.
प्रदीर्घ खंडानंतर सध्या येथे तोकड्या स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. गावात पाऊस तर शेतशिवारात ऊन, एक शिवार सोडून दुसऱ्या शिवारात पाऊस होत आहे. पावसाचे सातत्य राहिले तर ही पेरणी वाढीस लागेल अन्यथा हातातील भागभांडवल व बियाणे सुटून पदरी पुन्हा निराशा पडणार आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. यावर्षी येथील मृगाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. मूग, उडीद, ज्वारी, बाजरी ही कमी पाण्याची व कमी दिवसांची पिके असून, यासह भुईमूग पिकाचीदेखील काही ठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसून येत आहे. मात्र लांबलेल्या पावसामुळे येथे भुईमुगाचे क्षेत्रफळ घटले आहे, तर बाजरीचे क्षेत्रफळ वाढले आहे. पुढच्या आठवड्यात कांदा लागवडीस सुरुवात होणार आहे. येथे मिरचीचीही लागवड करण्यात येते.
यावर्षी मालपूर येथे मजुरीचे दर वाढले असून, निंदणीसाठी दिवसाला एका माणसाची मजुरी दोनशे रुपये आहे. कांदा लागवड, खत लावणे दोनशे रुपये, तर रोजच्या मजुरीचे दर तीनशे रुपये झाले असून, मजुरांना शेतशिवारात घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करावी लागत असल्याने मजुरीचा दर गगनाला भिडत आहे. यामुळे शेती श्वाश्वत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात.