देवाचे विखरण येथे द्वारकाधीश यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:05 IST2019-11-08T12:05:21+5:302019-11-08T12:05:48+5:30
पावसाचे सावट : व्यासायिकांची उडतेय तारांबळ

dhule
मालपूर: शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथे दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. यावर्षी पावसाचे संकट उभे राहिल्यामुळे यात्रेत विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांची तारांबळ उडतांना दिसून येत असून भाविकांचीही भंबेरी उडत आहे.
येथे दोंडाईचा धुळे रस्त्यालगत द्वारकाधीस मंदिर असून येथे भगवान विष्णूची स्वयंमभु खोदकामात सापडलेली मुर्ती असल्याचे गावकरी सांगतात. त्या मुर्तीची तत्कालीन परिस्थितीत विधीवत स्थापना करुन तेव्हा पासून म्हणजे दिडशे वर्षाची परंपरा आहे. परंपरागत कार्तिकी एकादशीच्या दिवशी यात्रा भरत असून धुळे जिल्हासह खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेपासुन खऱ्या अर्थाने खान्देशात यात्राना सुरुवात होत असल्याचे गावकरी सांगतात.
या यात्रेत दुरदुरवरुन भाविक नवस फेडण्यासाठी दाखल होत असतात. तर परिसरातील नागरिक संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी आजही गर्दी करतांना दिसून येतात. मात्र यावर्षी परतीच्या व चक्रीवादळ पावसाचे सावट कायम असून तसेच ७ नोव्हेंबर रोजी पावसाने हजेरी लावल्यामुळे विक्रेते व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसून आली. यामुळे व्यावसायिकांमध्ये चांगली नाराजी दिसून आली.
खेळणी विकणारे विक्रेते, दरवर्षी यात्रेत येणारे हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. सुमारे आठ दिवस या यात्रेची येथे वर्दळ सुरू असते. यात दोन दिवस दुरवरुन मनोरंजनासाठी तमाशा फड दाखल होतात. तसेच करमणुकीसाठी पालख्या विविध खेळांच्या कसरतींचे प्रकार देखील या यात्रेत पाहावयास मिळत असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असल्याचे दिसून येते.यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित ध्वज पूजन देखील झाले. यानंतर भजन गायनाने उत्सवास प्रारंभ झाला. कार्तिकी एकादशी निमित्ताने नामसंकिर्तन सप्ताह श्रीमद भागवत पारायण, किर्तन, प्रवचने, पालखी सोहळा आदींचे आयोजन केले आहे.