नोकरी गेली, बेरोजगार झालो म्हणून खचू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:16 IST2020-06-28T12:14:35+5:302020-06-28T12:16:28+5:30
चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क अब्जावधी लोंकाच्या दुनियेत तुमच्या विषयी विचार करायला लोकांना फक्त दोन मिनिटं असतात. काही ...

नोकरी गेली, बेरोजगार झालो म्हणून खचू नका
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अब्जावधी लोंकाच्या दुनियेत तुमच्या विषयी विचार करायला लोकांना फक्त दोन मिनिटं असतात. काही घडल्यावर चांगले किंवा वाईट या दोघांतील एकच प्रतिक्रिया आपल्याला मिळणार, आपण ज्याच्या सोबत जस वागलो आहे. त्या पध्दतीने लोक बोलतील याचा सहजपणे स्वीकार करा़ कोरोनाच्या काळात आर्थिक संकट आले, बेरोजगार झालो़ नोकरी गेली इतर ठिकाणी काम मिळेल का? यामुळे खचून जाऊ नका, नवीन मार्ग शोधला तर तुम्ही डिप्रेशनमधील निम्मी लढाई जिंकू शकाल, असे मत मानसोपचार तज्ञ प्रा़ वैशाली पाटील यांनी व्यक्त केले़
प्रश्न - मुलं तणावात जाऊ नये, यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी.
उत्तर - आई-वडिलांनी मुलांसोबत दिवसातून दोन तास तरी संवाद साधावा़ त्यावरून त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळेल़ मात्र हा संवाद मैत्रीपूर्ण असावा. त्यांना आवडेल त्या विषयावर बोला. मुलांना नाही म्हणायची सवय लावावी, प्रत्येक गोष्ट मागितली की होते ही सवय लावू नका. त्यांना प्रत्येक निर्णयात सहभागी करा, अपयश आले तर यशस्वी स्पर्धकाला अभिनंदन करून ये, असाही सल्ला द्या़ त्यामुळे ते अपयश पचवू शकतील़
प्रश्न - संताप व राग यातून होणाऱ्या आत्महत्यांचे नेमके कारण काय?
उत्तर- नोकरी गेली, बेरोजगार झाला, अपयश आले, आई-वडिलांनी रागवले किंवा प्रेम प्रकरणातून नकार अशा असंख्य गोष्टी आत्महत्येस कारणीभूत असतात़ अशा गोष्टी व्यक्त करण्यासाठी विश्वासू व्यक्ती मिळत नाही़ तसेच वेळेवर आधार मिळत नसल्याने डिप्रेशन वाढते़ मग त्याला शुल्लक निमित्त कारणीभूत ठरते़ अशी व्यक्ती कित्येक महिने किंवा वर्षांपासून एटिपिकल डिप्रेशनच्या शिकार झालेली असते़ त्यांना नकार पचविण्याची क्षमता नसते.
प्रश्न - बालमनावर संस्कार घडविण्यासाठी पालकानी काय करावं?
उत्तर- बाळाचा जन्म झाल्यावर त्याला भाषा, संस्कृती, शिक्षण सगळं शिकवलं जातं, पण भावना व्यवस्थापन शिकवलं जात नाही. यात राग, लोभ, मत्सर, आनंद, दु:ख या सगळ्या भावनांचे शास्त्र शिकवणं आवश्यक आहे. या भावना आहेत आणि या प्रत्येकात असतात. याची जाणीव बालमनावर करण्यात समाजाचे, शालेय अभ्यासक्रमाचे अपयश आहे. डिप्रेशन आणि खिलाडू वृत्ती
जीवनातील यश, अपयश हा एक खेळ असतो़ यश आणि अपयशाचा सदरा फक्त त्याच एका दिवसासाठी घालून त्या दिवसाच्या रात्री घराच्या अंगणातच तो सदरा बाहेर टाकून घरात पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येता आले पाहिजे़ या दोन्ही गोष्टी पचविण्यासाठी मनोधैर्य असावे लागते. वैयक्तिक आयुष्यात सुखी समाधानी कोणीही नसते मात्र मार्ग काढून प्रत्येकाला जीवन जगता आले पाहिजे़
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवा
अनेकदा आपली मानसिकता खचायला लागते. मात्र प्रत्येक संकटात तुम्ही नवीन संधी म्हणून पाहिले तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल़ लक्षात घ्या संकट तुमची उंची आणि प्रगल्भता वाढवायला येतात. केवळ परिस्थिती आपल्याला दुबळे बनवत नाही तर परिस्थितीकडे पाहण्याची आपला अविवेकी दृष्टिकोन आपल्याला दुर्बल करत असतो. कारण दगडाचे अंतरंग भेदण्याची अमोघ शक्ती त्या हिरव्या कोंबातच असते.