दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:57+5:302021-05-05T04:58:57+5:30
धुळे - सध्या १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र लसीचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. त्यातच पहिला डोस ...

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
धुळे - सध्या १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र लसीचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. त्यातच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डॉस घ्यायचा आहे. त्यासाठीचा त्यांचा आवश्यक कालावधी पूर्ण झाला आहे. पण डोस शिल्लक नसल्याने त्यांना उशीर होत आहे. मात्र दुसऱ्या डोसला उशीर झाला तरीही घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ४५ दिवस ते ३ महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेऊ शकतो अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ५५ पेक्षा कमी वयाच्या रुग्णांमधील मृत्यूही वाढले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत मोठी भीती पसरली आहे. त्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने इच्छा असूनही लस घेता येत नाही. तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना २८ किंवा ४५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यामुळे दुसरा डोस मिळावा यासाठी अशा नागरिकांची धडपड सुरु झाली आहे. मात्र लसचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागत आहे. वेळेत दुसरा डोस घेतला नाही तर काही त्रास तर होणार नाही अशी भीती या नागरिकांना वाटत आहे. दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तरी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र लसीकरण मोहिमेला गती कधी येईल असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
डोसला उशीर झाला तरी घाबरू नका -
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४५ दिवसांनी घ्यावा अशा सूचना शासनाने केल्या आहेत. अनेक नागरिकांचे पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवस पूर्ण झाले आहेत. पण सध्या सुरु असलेल्या लस कोंडीमुळे त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. डोस घेण्यास उशीर झाला तरी चालेल. त्यात घाबरण्यासारखे काहीही नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.
दुसऱ्या डोस साठी एक दिवस थांबा -
जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी कोवॅक्सीन या लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र त्यानंतर कोवॅक्सीन लस उपलब्ध न झाल्याने त्यांचा दुसरा डोस बाकी आहे.
कोवॅक्सीन या लसीचे १२ हजार डोस बुधवारी प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
ज्यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोस राहिला आहे अशा नागरिकांना गुरुवार पासून डोस घेता येणार आहे. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.