दोंडाईचा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:05 IST2020-03-31T21:04:43+5:302020-03-31T21:05:05+5:30
नगरपालिका : पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आठ तासात तांत्रिक अडचण केली दूर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा शहराला पाणी पुरवठा करणाºया तापी नदीवरील तावखेडा येथील विद्युत मोटर व इतर साहित्य उच्च दाबाने वीज पुरवठा झाल्याने जळून गेले होते. परंतू अवघ्या आठ तासात पालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम करुन पाणीपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जीवनावश्यक सुविधेत खंड न पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईचा नगरपालिका सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे. त्यातच रविवारी तांत्रिक बिघाड यामुळे पाणीपुरवठयास अडचण आली होती. दोंडाईचा शहराला पाणीपुरवठा करणाºया तापीवरील तावखेडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० एच. पी. क्षमता असणारी मोटार, स्टार्टर व इतर साहित्य जळुन खाक झाले. तांत्रीक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला.
आमदार जयकुमार रावल ,नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील चक्रे वेगात फिरले. त्यानुसार पाणीपुरवठा सभापती वैशाली प्रविण महाजन यांच्या नियंत्रणाखाली धुळे येथुन स्टार्टर व इतर आवश्यक विद्युत साहित्य मागविण्यात आले. राखीव जादा असलेली विद्युत मोटर बसविण्यात आली. सलग आठ तास अथक परिश्रम करून दोंडाईचा शहराला आज नियमित पाणीपुरवठा करण्यात आला.
शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून मुख्याधिकारी डॉ. दिपक सावंत, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखिल जाधव, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे, सत्यम पाटील, पाणीपुरवठा वितरण विभागाचे दिनेश विंचु, छोटु धनगर, छोटु ओतारी, संजय धनगर, रामसिंग गिरासे यांनी परिश्रम घेतले.