पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:47+5:302021-08-18T04:42:47+5:30
धुळे : शहरासह परिसरात सध्या व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच पावसाळ्यात रस्त्यावर विकले जाणारे जंक फुड सेवन ...

पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?
धुळे : शहरासह परिसरात सध्या व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच पावसाळ्यात रस्त्यावर विकले जाणारे जंक फुड सेवन केल्यामुळे तसेच अशुद्ध पाणी पिल्यामुळे होणाऱ्या टायफाईडसदृश आजाराच्या रुग्णांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रत्येक ५० रुग्णांमागे दोन रुग्ण टायफाईडचे आढळून येत आहेत. लहान मुले आणि महिलांमध्ये पाणीपुरी खाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. उघड्यावर विक्री होणाऱ्या या खाद्यपदार्थांमुळे टायफाईड अर्थात विषमज्वर होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
सरकारी रुग्णालयातील टायफाईडचे रुग्ण : जून २, जुलै २, ऑगस्ट २
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत अनुक्रमे २५, ३२, ६६ रुग्णांची तपासणी झाली. प्रत्येक महिन्यात दोन रुग्णांचा अहवाल टायफाईड पाॅझिटिव्ह आला आहे.
आजाराची लक्षणे
टायफाईड झाला तर पहिल्या आठवड्यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी असा त्रास होतो. अस्वस्थता वाटते.
डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आठवड्यात टेस्ट निगेटिव्ह येते.
दुसऱ्या आठवड्यात ताप प्रचंड वाढतो. उलट्या आणि हगवण लागते. रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. यावेळी केलेली टेस्ट पाॅझिटिव्ह येते.
तिसऱ्या आठवड्यात गुंतागुंत वाढते. विष्ठेतून रक्त येणे, शरीरात पाणी कमी होणे, शरीरावर पुरळ येणे, पांढऱ्या पेशी कमी होणे अशी लक्षणे आढळून येतात.
ही घ्या काळजी...
शहरात डेंग्यूसह टायफाईडचेही रुग्ण आढळून येत आहेत. साथीच्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणे टाळावे, ताज्या आणि गरम पदार्थांचे सेवन करावे, घरात, घराशेजारी आणि परिसरात स्वच्छता राखावी, अशी काळजी घेतली तर या आजारापासून दूर राहता येते. लक्षणे आढळल्यास त्वरित डाॅक्टरांना दाखवावे, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.