दुखणे अंगावर काढू नका, तात्काळ तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:18+5:302021-04-11T04:35:18+5:30

- भूषण चिंचोरे एकूण बाधित रुग्णांच्या संख्येबरोबरच गंभीर रुग्णांचीही संख्या वाढली आहे. लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ तपासणी करा व लवकर ...

Do not remove the pain, check immediately | दुखणे अंगावर काढू नका, तात्काळ तपासणी करा

दुखणे अंगावर काढू नका, तात्काळ तपासणी करा

Next

- भूषण चिंचोरे

एकूण बाधित रुग्णांच्या संख्येबरोबरच गंभीर रुग्णांचीही संख्या वाढली आहे. लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ तपासणी करा व लवकर उपचार सुरू करा. लवकर उपचार घेतलेले रुग्ण कमी दिवसांत बरे होतात. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका, असे आवाहन हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांनी केले आहे.

प्रश्न - पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर अचानक रुग्णसंख्येत वाढ का झाली ?

उत्तर - दुसरी लाट येण्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता आली. डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात अनेक ठिकाणी गर्दी वाढली. सामान्य नागरिक आणि प्रशासन दोन्हीही नियम पाळण्यात गाफील राहिले, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला.

प्रश्न - तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याचे काय कारण असावे ?

उत्तर - रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुखणे अंगावर काढणे व दुसऱ्या लाटेत बदललेली लक्षणे ही त्याची दोन प्रमुख कारणे आहेत. नागरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ताप आला असेल तरीही, मी आजारी नाही. उन्हामुळे ताप आला अशी कारणे देत लक्षणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचार घ्यायला उशीर केल्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होते. जे रुग्ण लवकर कोरोना चाचणी करून तात्काळ उपचारांना सुरुवात करतात, ते कमी दिवसात कोरोनामुक्त होतात. तसेच त्यांना कमी त्रास होतो.

प्रश्न - लक्षणांमध्ये कोणते बदल झाले आहेत ?

उत्तर - मागील वर्षाप्रमाणे ताप, सर्दी, खोकला असणारे रुग्ण आहेत तसेच दुसऱ्या लाटेत लक्षणांमध्येही बदल झालेला आहे. अनेक रुग्णांना पोटदुखीचा त्रास होत आहे. उलट्या, जुलाब व अंगदुखी आदी लक्षणे आढळत आहेत. तसेच कमी कालावधीत न्यूमोनिया होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोटदुखी, अंगदुखी, जुलाब आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी कोरोना चाचणी करायला हवी.

प्रश्न - दुसरी लाट कधी नियंत्रणात येईल ?

उत्तर - दुसरी लाट कधी नियंत्रणात येईल, हे सांगणे कठीण आहे. रुग्णसंख्येतील वाढ थांबल्यानंतर पहिली लाट ओसरली होती. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या ५०० पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे हे आशादायी चित्र आहे. पण यावेळी विषाणूत बदल झालेला आहे. तसेच गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, बाधित रुग्णांची संख्या कमी होत राहिली तर दुसरी लाट नियंत्रणात येऊ शकते.

सेंट्रल ओपीडीत करा तपासणी -

तुमचा कोरोना चाचणीचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला असेल तर जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या सेंट्रल ओपीडीत तपासणी करा. तुमची लक्षणे व प्रकृती पाहून कोणत्या ठिकाणी दाखल करायचे, याचा सल्ला त्याठिकाणी मिळेल. तसेच गृहविलगीकरणा बाबत सल्ला दिला जाईल.

मनुष्यबळाची मागणी -

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांसाठी २०६ बेड राखीव होते, पण रुग्णांची संख्या वाढल्याने इतर वॉर्ड नव्याने तयार करून ३५० बेड तयार केले आहेत. कुशल मनुष्यबळाची मागणी शासनाकडे केली आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाले तर आणखी बेड वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच आणखी ३० व्हेन्टिलेटरची मागणी केली आहे.

आणखी एक ऑक्सिजन टँक उभारणार -

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यरत आहे. मात्र, ऑक्सिजनची गरज वाढल्याने आणखी एक ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले. २० हजार लिटर इतकी क्षमता असलेला टँक एक महिन्याच्या आत उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Do not remove the pain, check immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.