विभागीय आयुक्तांनी ४८ हरकती फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST2019-05-15T11:51:28+5:302019-05-15T11:52:50+5:30
जिल्हा परिषद प्रभाग रचना : केवळ एकच हरकत मान्य केली

विभागीय आयुक्तांनी ४८ हरकती फेटाळल्या
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त ४९ हरकतींवर ८ मे रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. यापैकी ४८ हरकती अमान्य करण्यात आली. तर केवळ एकच हरकत मान्य करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाचे कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची रचना व एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच स्त्रियांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसह राखून ठेवलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण दर्शविणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्द केला होता.
त्यावर हरकत, सूचना मांडण्यासाठी ६ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुदतीअखेर एकूण २० हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर निवडणूक कार्यक्रमास स्थगिती मिळण्यापूर्वी २९ हरकती प्राप्त झालेल्या होत्या.
त्यामुळे या २९ व आताच्या २० हरकती अशा एकूण ४९ हरकतींवर ८ मे रोजी नाशिक विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. सुनावणीनंतर आयुक्तांनी निर्णय राखून ठेवला होता. या हरकतींवरील निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार ४९ पैकी ४८ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. तर एक हरकत मान्य करण्यात आली आहे. मान्य केलेली हरकत ही शिरपूर तालुक्यातील आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसख्या अधिक आहे, त्या गावाचे नाव गणास द्यावे, अशी सूचना या हरकतीत नमुद होती. ही हरकत मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या ग्रामपंचायतीचे नाव त्या गणास दिले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.