रब्बीचे क्षेत्र वाढूनही जिल्ह्याचा खतांचा साठा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:31 IST2017-10-23T15:28:15+5:302017-10-23T15:31:08+5:30
गेल्यावर्षाच्या तुलनेत ५ हजार मेट्रीक टन साठा कमी मिळाला

रब्बीचे क्षेत्र वाढूनही जिल्ह्याचा खतांचा साठा घटला
आॅनलाईन लोकमत
धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. रब्बीसाठी कृषी विभागाकडून खतांचे नियोजन करण्यात आले असून, मागणी पैकी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झाली आहेत. गेल्यावर्षी ७३ हजार ७६० मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यातुलनेत यावर्षी ५ हजार ६० मेट्रीक टन खतांचा साठा कमी झाला आहे. दरम्यान शेतकºयांना खतांची कमी पडू दिली जाणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्हयात १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या पेरणीत १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
रब्बीसाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे १ लाख २२ हजार ९८० मेट्रीक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी जिल्ह्यासाठी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झालेली आहेत.
यात युरिया २९ हजार ७०० मे.टन, डीएपी-४९००, पोटॅश-४ हजार, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी)- १३ हजार २००, तर एनपीके १६ हजार ९०० मेट्रीक टनाचा समावेश आहे.
पाच हजार टन साठा घटला
गेल्यावर्षी रब्बीचे क्षेत्र कमी होते.असे असतांनाही ७३ हजार ७६० मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झालेला होता. यावेळी रब्बीचे क्षेत्र वाढूनही, गेल्यावर्षापेक्षा पाच हजार ६० मेट्रीक टन साठा घटल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणी
रब्बीसाठी ६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून ४७ हजार ९३७ क्विंटल, तर खाजगी कंपन्यांकडून २० हजार ६८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.
बियाणे उपलब्ध
महाबीजकडून बियाणे उपलब्ध झालेली आहेत. यात गहू- १३हजार १४० क्विंटल, हरभरा- २७७० क्विंटल, भूईमुग-२२५० क्विंटल, सुधारित रब्बी ज्वारी-७३५ तर सूर्यफुलाचे -१० क्विंटल बियाणे उबलब्ध आहे.
खते कमी पडू देणार नाही : बैसाणे
रब्बीसाठी खतांचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकºयांना खतांची अडचण भासू देणार नाही. मागणीनुसार पुरवठा होत असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी सांगितले.