जिल्ह्यात आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:05+5:302021-01-16T04:40:05+5:30
धुळे : जिल्ह्यात शनिवार, १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य ...

जिल्ह्यात आजपासून
धुळे : जिल्ह्यात शनिवार, १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
डॉ. नवले यांनी म्हटले आहे की, कोविड १९ लसीकरण मोहीम जिल्हा रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, ग्रामीण रुग्णालय, साक्री व प्रभातनगर- धुळे शहर, असे ४ शीतसाखळी केंद्रांवर राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी प्रथम दिवशी प्रति लसीकरण केंद्र १०० लाभार्थी याप्रमाणे एकूण ४०० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात एकूण १० हजार १७० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे १२ हजार ४३० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. यामध्ये धुळे महानगरपालिकेला ५ हजार २५० डोस, उपजिल्हा रुग्णालय शिरपूरला तीन हजार २६० डोस व ग्रामीण रुग्णालय साक्रीला तीन हजार ९२० डोस पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहीम चार केंद्रांवर होणार असून, यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी आणि लस टोचकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रांवर लसीकरणबाबत माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी आज करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन होईल. त्यानंतर जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विशाल पाटील आदी उपस्थित राहतील, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी म्हटले आहे.