जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : नाॅन कोविड रुग्णांवर होणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:16+5:302021-07-23T04:22:16+5:30
धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचाराच्या सूचना ...

जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : नाॅन कोविड रुग्णांवर होणार उपचार
धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचाराच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाची निर्जंतुकीकरण करून अहवाल भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून मागविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक तथा भूलतज्ज्ञ डॉ. अश्विनी भामरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. गीतांजली सोनवणे, डॉ. अश्विनी गिऱ्हे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प, बाह्यरुग्ण कक्ष, स्कॅनिंग यंत्रणा, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला बालरुग्ण विभागाची पाहणी केली.
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्णसंख्या मोठ्या संख्येने येतात. त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून द्याव्यात. जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवश्यक ऑक्सिजन, खाटांची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भडांगे, अधीक्षक डॉ. भामरे, डॉ. शिंदे यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना जिल्हा रुग्णालयात कार्यरत मनुष्यबळ, उपलब्ध सोयीसुविधांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांना सुरवात झाली असून, लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शस्त्रक्रिया गृह सहायक अमोल जाधव, सचिन कुंभार, कविता सरदार, प्रतिभा घोडके आदी उपस्थित होते.