५० टक्के वीज बिल माफ
करण्याची मागणी
धुळे : कोरोनाच्या काळात वाढीव वीज बिले वीज वितरण कंपनीने दिली आहेत. ५० टक्के वीज बिल माफ करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते; मात्र वीज मंत्री राऊत यांनी वीजमाफीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला नाही. दिल्ली सरकार १०० टक्के वीज बिल व पाणीपट्टी माफ करते. मग महाराष्ट्र सरकार का वीज बिल माफ नाही करू शकत. ठाकरे सरकारने पुढील तीन महिने शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सुट द्यावी, अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन करणार, असा इशारा ॲड. अशोक शंकर पाटील यांनी दिला आहे.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त
करण्याची मागणी
म्हसदी : बिबट्याच्या उपद्रवाला कंटाळलेल्या म्हसदीसह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे धाव घेतली आहे. म्हसदी, ककाणी, भडगाव, राजबाई, शेवाळी, काळगाव, विटाई, चिंचखेडे, बेहेड, वसमार, धमनार आदी गावांच्या परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पशुधन फस्त करणारा बिबट्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन विभागाने बिबट्यासह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गळतीमुळे होतेय
पाण्याची नासाडी
धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेचे नियोजन तीन ते चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे असले तरी तांत्रिक कारणामुळे अनेक भागात वेळेत पाणी पुरवठा होत नाही. त्यातच शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत, तसेच काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहे.
जिल्हास्तरीय निबंध
स्पर्धेचे आयोजन
धुळे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अण्णा माळी यांचा सत्कार २८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने त्यानिमित्त स्पर्धा होतील. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून निबंध पाठवावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे. राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
घंटागाडीची वेळ
निश्चित करावी
धुळे : शहरात काही भागांमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाड्या नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कचरा कुठे टाकावा? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. घरातील लहान कचराकुंडीमध्ये दोन-चार दिवस कचारा साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे; परंतु घंटागाडी नियमित आणि वेळेवर येत नाही. घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगारांचे वेतन संबंधित ठेकेदार नियमित आणि वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी आहेत, तरी मनपाच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. बऱ्याच ठिकाणी आठवड्यातून एकदा घंटागाडी येत असल्याने ती नियमित असावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.