महापालिकेवर सत्ता स्थापनेची चर्चा केवळ चर्चाच ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:46+5:302021-09-14T04:42:46+5:30
ते नगरसेवक दमन शहरातच भाजपच्या नगरसेवकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी शनिवारी शहरातील टाॅपलाईन हॉटेलमध्ये पक्षनिरीक्षकांची बैठक झाल्यानंतर ४६ ...

महापालिकेवर सत्ता स्थापनेची चर्चा केवळ चर्चाच ठरली
ते नगरसेवक दमन शहरातच
भाजपच्या नगरसेवकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी शनिवारी शहरातील टाॅपलाईन हॉटेलमध्ये पक्षनिरीक्षकांची बैठक झाल्यानंतर ४६ नगरसेवकांना दमन येथे हलविण्यात आले आहे. रविवारी रात्री काही नगरसेवक व भाजपच्या एका मोठ्या पदावरील व्यक्तीशी शाब्दिक वाद झाला. त्यामुळे भाजपमध्ये महापाैर पदावरून नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, दमन येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या काही नगरसेवकांनी धुळ्याकडे जाण्याचा रात्री निर्णय घेतला. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर ते त्याच ठिकाणी थांबल्याचे समजते.
काही नगरसेवक महाविकास आघाडी नेत्यांच्या संपर्कात
महापौर पदासाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी प्रतिभा चौधरी, संजय पाटील, तसेच प्रदीप कर्पे यांनीदेखील अर्ज घेतले होते. उमेदवारी अर्ज घेतलेल्या नगरसेवकांनी वाटत होते की, पक्षाकडून आपल्याला संधी दिली जाईल. सोमवारी दुपारी दोन वाजेेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने रविवारी रात्री पक्षाकडून नगरसेवक प्रदीप कर्पे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेतलेल्या नगरसेवकांची नाराजी अधिक वाढली. त्यातील नगरसेवक संजय पाटील यांनी भाजपविरोधात बंड पुकारत साेमवारी दुपारी दोन वाजेेेेपर्यंत महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्यण घेतल्याची जोरदार चर्चा होती.
महापालिकेत भाजपचे काही पदाधिकारी होते लक्ष ठेवून
दमन येथून सहा नगरसेवक धुळ्यात आल्याची दुपारी १२ वाजेपर्यंत जोरदार चर्चा होती. त्यात नगरसेवक संजय पाटील हे दुपारी दोन वाजेपर्यंत महापालिकेत अर्ज दाखल करण्याची चर्चा होती. त्यामुळे हा अर्ज भरण्यापूर्वी नगरसेवक पाटील यांना थांबविण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी महापालिकेत लक्ष ठेवून होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आमदार डाॅ. फारूख शाह, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी दाखल झाल्याने आणखी या चर्चेत भर पडली होती. दुपारी २.१० पर्यंत नगरसेवक पाटील महापालिकेत अर्ज दाखल करण्यासाठी न आल्याने अखेर या चर्चेला पूर्णविराम आला.
आम्हाला घोडेबाजार नको
महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या नगरसेवकांना आम्ही विकत घेऊ शकत नाही. मात्र, आमच्या पक्षाकडून सत्तास्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्हाला राजकारणात घोडेबाजार नको आहे.
- कमलेश देवरे
विरोधी पक्षनेता, महापालिका
महापौर पदासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. धुळे महापालिकेवर आगामी अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर नक्की बसले यात अजिबात शंका नाही.
-साबीर शेख,
राष्ट्रवादी काँग्रेस
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांना आवाहन केले होते की, शहरात कोणत्याही प्रकारचे विकासकाम होताना दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सर्वांनी विकासाला हात दिल्यास आगामी काळात राज्य सरकारकडून प्रत्येकाच्या प्रभागासाठी भरीव निधी आणून शहराचा विकास करू, एमआयएम पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच भाजपाचे काही नगरसेवकदेखील संपर्कात आहेत.
डॉ. फारूख शाह
आमदार धुळे शहर
महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काही नगरसेवक संपर्कातदेखील आहे. सत्ता स्थापन होईल अशी खात्री आहे.
- महेश मिस्तरी
शिवसेना