अमरावती नदीपात्रात पूल नसल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:02 IST2020-03-20T15:01:55+5:302020-03-20T15:02:29+5:30
पूलाची मागणी : प्रकल्पातून विसर्ग सोडल्यास शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर-रामी रस्त्यादरम्यान अमरावती नदीपात्रावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. नदीवर पूल नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
पावसाळ्यादरम्यान अमरावती प्रकल्पामधून वेळोवेळी पाणी सोडावे लागत असल्यामुळे या पाण्यातून मालपूर ग्रामस्थ मार्गक्रमण करत असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर मालपूर गावाचे अमरधाम असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते.
मालपूर बसस्स्थानक येथून तालुक्यातील रामी व नंदुरबार जिह्यातील नंदुरबार व शहादा येथे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असून सोयीचा आहे. या रस्त्यावरुन खूप मोठी रहदारी असते. मात्र पावसाळ्यात अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर किंवा धरणाच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अचानक केव्हाही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे हा रस्ता पुलाअभावी बंद होतो.
मालपूर ग्रामस्थांच्या शेतजमिनी कसण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच या शेतकऱ्यांचे पशुधन देखील शेतशिवारातच असल्यामुळे नाईलाजास्तव धोका पत्करुन पाण्यातून हे शेतकरी मार्गक्रमण करीत असतात. खरीपातील शेती उत्पन्न घरादारात आणण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे नदीपात्रात पूल होणे गरजेचे आहे.
याच मार्गावर ग्रामदैवत श्री व्यांघ्रंबरीदेवीचे मंदिर असून दूरवरचे भाविक येथे सदैव दर्शनासाठी व मानमानता फेडण्यासाठी येत असतात. मात्र पूल नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.
शासनाने वेळीच दखल घेऊन या उन्हाळ्यात अमरावती नदीपात्रात पूलाची निर्मिती करावी, अशी मालपूर ग्रामस्थांसह मोयाने, चोरझिरा आदी शेतशिवारातील शेतकºयांची व या मार्गावरुन प्रवास करणाºया प्रवाशांची मागणी आहे.