शाळेची वेळ बदलल्याने सेतू अभ्यासक्रम राबविण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST2021-07-30T04:37:51+5:302021-07-30T04:37:51+5:30
धुळे: विद्यार्थी नियमित शाळेत येत नाहीत, तोपर्यंत शाळेची वेळ एक तासाने कमी करून सकाळच्या सत्रात ७ ते ११:२५ या ...

शाळेची वेळ बदलल्याने सेतू अभ्यासक्रम राबविण्यात अडचणी
धुळे: विद्यार्थी नियमित शाळेत येत नाहीत, तोपर्यंत शाळेची वेळ एक तासाने कमी करून सकाळच्या सत्रात ७ ते ११:२५ या वेळेत शाळा भरवावी, अशी अशी मागणी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.
याबाबत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण समिती सभापती मंगला सुरेश पाटील आणि शिक्षणाधिकारी मनिष पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळेत न बोलवता जिल्ह्यातील सर्व शिक्षक हे ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण देत आहेत; परंतु २२ जुलैपासून शाळेच्या वेळेत बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांंचा सेतू अभ्यासक्रम घेताना अडचणी निर्माण होत आहेत.
विद्यार्थ्यांंना सकाळच्या वेळेत ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासाची सवय झाल्याने विद्यार्थ्यांंची व पालकांची गैरसोय न करता विद्यार्थ्यांसाठी जोपर्यंत विद्यार्थी नियमित शाळेत येत नाहीत, तोपर्यंत शाळेची वेळ सकाळच्या सत्रात करण्यात यावी. याबाबत जिल्ह्यातील बहुतेक शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही अशीच मागणी होत आहे.
तसेच विद्यार्थी मागील वर्षी नियमित शाळेत येत होते, तेव्हा विद्यार्थ्यांंसाठी मध्यान्ह भोजनासाठी ३५ मिनिटे व दोन लहान सुटीसाठी २० मिनिटे अशी दिवसांतून ५५ मिनिटे सुट्टी दिली जात होती; परंतु सध्या विद्यार्थी शाळेत येतच नाहीत म्हणून शालेय वेळेतील ५५ मिनिटे कमी करून विद्यार्थी नियमित शाळेत येत नाहीत तोपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात ७ ते ११:२५ या वेळेत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सदस्य रवींद्र खैरनार, गमण पाटील, शरद पाटील, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, सुरेंद्र पिंपळे, चंद्रकांत सत्तेसा, भूपेश वाघ, पुखराज पाटील, शरद सूर्यवंशी, भगवंत बोरसे, ज्ञानेश्वर बाविस्कर, हारुण अन्सारी, संजय वाघ, अनिल तोरवणे, उमराव बोरसे, बापू गांगुर्डे, विजय पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण गवळे, योगेश धात्रक, मिलिंद वसावे, गौतम मंगासे, राजेंद्र मदन भामरे, नगराम जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहेत अडचणी
१ जुलैपासून शासनाच्या आदेशान्वये सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे व विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत हा अभ्यासक्रम प्रत्येकाला घरी जाऊनच दिला जात आहे. या वेळेत पालकसुद्धा घरी राहत असल्यामुळे पालकांसमोर विद्यार्थ्यांना अभ्यास दिल्याने विद्यार्थी दिलेला अभ्यास बरोबर करत होते; परंतु २२ जुलैपासून शाळेची वेळ १०:३० ते ४:४० केली आहे. सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे पाल्य असल्याने ७० ते ८० टक्के पालक मुलांना १० वाजताच त्यांच्या बरोबर शेतात घेऊन जातात. त्यामुळे सेतू अभ्यासक्रम घेताना अडचणी येत आहेत. बरेचसे विद्यार्थी दुपारुन गावात भेटत नसल्याने सेतू अभ्यासक्रम राबविताना शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते आहे.