हिरे महाविद्यालयात रुग्णांना नातेवाईकच नेतात स्ट्रेचरवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:45+5:302021-01-25T04:36:45+5:30
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना नातेवाईकच स्ट्रेचरवरून घेऊन जात असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ...

हिरे महाविद्यालयात रुग्णांना नातेवाईकच नेतात स्ट्रेचरवरून
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना नातेवाईकच स्ट्रेचरवरून घेऊन जात असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे स्ट्रेचर उपलब्ध असल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. रुग्णांना कर्मचारीच स्ट्रेचरवरून घेऊन जातात; मात्र काही वेळेस कर्मचारी उपलब्ध नसतात, त्यावेळी स्ट्रेचर हातात घेण्याची वेळ नातेवाइकांवर येत असते. मात्र असे प्रसंग कमी प्रमाणात येतात, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. वैद्यकीय महाविद्यालयात बहुतेक वेळा रुग्णांना स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ नातेवाइकांवर येते. मात्र दुसरा पर्याय नसल्याने नातेवाईकच ती जबाबदार पार पाडतात. हिरे महाविद्यालयाच्या क्षमतेच्या तुलनेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाकाळात महापालिकेकडून ३० कर्मचारी वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाले होते. आता मात्र कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने कर्मचारी पुन्हा महापालिकेत रुजू होणार आहेत. मात्र त्यांना आणखी काही दिवस हिरे वैद्यकीय महाविद्यालयातच राहू द्यावे यासाठी महाविद्यालयाने महापालिकेकडे गळ घातल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलावले तर हिरे महाविद्यालयातील परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
रुग्णांना स्ट्रेचरवरून घेऊन जाण्यासाठी कर्मचारी तत्पर असतात. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षमतेच्या तुलनेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कोरोनाकाळात महापालिकेकडून काही चतुर्थश्रेणी कर्मचारी मिळाले होते. त्यामुळे चांगली मदत झाली. महापालिकेची क्षमता पुन्हा वाढली आहे. बेड व आयसीयूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अधिक गरज भासत आहे. राज्य शासनाने जाहीर केले भरतीप्रक्रियेतून काही कर्मचारी मिळण्याची आशा आहे.
- राजकुमार सूर्यवंशी,
वैद्यकीय अधीक्षक, हिरे महाविद्यालय
हिरे महाविद्यालयात नातेवाइकास दाखल केले आहे. रुग्णालयात स्ट्रेचरवरून घेऊन जायचे होते. मात्र वेळेवर कर्मचारी उपलब्ध झाला नाही त्यामुळे आम्हीच स्ट्रेचर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. व स्ट्रेचर घेऊन रुग्णाला दुसऱ्या खोलीत हलवले.
- नातेवाईक
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी भावाला दाखल केले आहे. दोन वेळेस भावाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवण्याचा प्रसंग आला. पहिल्या वेळेस कर्मचारी उपस्थित होता. मात्र दुसऱ्या वेळी कर्मचारी न आल्याने स्वतः स्ट्रेचरवरून हलवले.
- नातेवाईक