धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवडीची बंदद्वार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:03 IST2020-02-12T12:02:52+5:302020-02-12T12:03:11+5:30
तब्बल पावणेदोन तास सभेचे चालेले कामकाज, तीन सभापतींचे झाले खातेवाटप, धोरणात्मक निर्णय नाही

धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवडीची बंदद्वार चर्चा
आॅनलाईन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी झाली. या सभेत विविध विषय समिती सदस्य निवडीची चर्चा तसेच सभापतींचे खातेवाटप बंदद्वार करण्यात आले. सभेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही सभागृहात थांबण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान हा प्रकार चुकीचा असल्याचे मत विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी मांडले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ५६ पैकी ३९ जागा जिंकून सत्ता मिळविली आहे. तब्बल सात महिन्यानंतर होणाऱ्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.
मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामकृष्ण खलाणे, समाज कल्याण समिती सभापती मोगराबाई पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती मंगलाबाई पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी.सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थित होते.
निवडणुकीनंतर पहिलीच सभा असल्याचे सत्ताधाऱ्यांसह सर्व विरोधी गटातील सदस्य आवर्जून उपस्थित होते. काही सदस्यांचे नातलगही सभागृहात दाखल झाले होते. सुरवातीला स्वागत झाल्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरूवात झाली. अजेंड्यावर फक्त सभापतींचे खाते वाटप विषय समिती सदस्य निवडीचाच होता.
इतरांना बाहेर जाण्याची सूचना
अध्यक्षांनी सभागृहात सदस्य व अधिकाºयांव्यतिरिक्त असलेल्या इतरांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच सभेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यमांचे प्रतिनिधी, तसेच छायाचित्रकारांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
दरवाजे केले बंद
सदस्य व अधिकारी यांच्या व्यतिरिक्त असलेले सभागृहातील इतर नागरिक बाहेर पडल्यानंतर सभागृहाचे सर्वच दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला.
बंदद्वार समिती सदस्य
निवडीची चर्चा
जिल्हा परिषदेत असलेल्या विविध विषय समिती सदस्यांची निवड करायची होती. समिती सदस्य म्हणून कोणा-कोणाला प्राधान्य द्यायचे यावर जवळपास दीडतास मंथन झाले. मात्र ही सर्व चर्चा बंदद्वार करण्यात आली. दुपारी ३.४० वाजता सभा आटोपली.
समिती सदस्य निवडीचे
अधिकार अध्यक्षांना
यानंतर माहिती देतांना जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे म्हणाले, स्थायी, जलव्यवस्थापन, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, बांधकाम-अर्थ, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण या विविध विषय समिती गठीत करून सदस्य निवडीचे अधिकारी अध्यक्षांना देण्यात आले आहेत. लोकशाही पद्धतीने ही निवड व्हावी, विरोधी गटातील सदस्यसंख्येनुसार प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान इच्छुक असलेल्यांनी सदस्यत्वाचा अर्ज अध्यक्षांकडे दिला.