धुळ्यातील युवकांनी वेधले गड, किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:15 IST2020-02-22T23:15:13+5:302020-02-22T23:15:39+5:30
युवक स्वराज्य ग्रुपचा उपक्रम । प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो धुळेकरांनी दिली भेट

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उभारलेल्या ऐतिहासिक गड, किल्ले यांची आज दुरावस्था झाली आहे़ या महत्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यातील युवकांनी शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला आहे़
युवक स्वराज्य ग्रुपच्या तरुणांनी ‘ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्यांचे वैभव व आज किल्ल्यांची झालेली दुरावस्था’ या विषयावर प्रदर्शन आयोजित केले आहे़ शहरातील महाराणा प्रताप चौकात शासकीय विद्या निकेतन शाळेच्या प्रांगणात दि़ २१, २२, २३ असे दिवस हे प्रदर्शन खुले आहे़
विशेष म्हणजे हे केवळ गड किल्ल्यांचे प्रदर्शन नसून यात तुलनात्मक देखावा साकारण्यात आला आहे़ सिंहगड कोंढाणा किल्ला, लोहगड, सिंधुदूर्ग, रायगड, प्रतापगड आदी किल्ल्यांच्या दोन प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून त्यातून त्या काळातील किल्ला आणि आजच्या परिस्थितीत झालेली किल्ल्यांची दुरावस्था याची प्रभावीपणे तुलना करण्यात आली आहे़ प्रदर्शन धुळे शहरात होत असल्याने लळिंग किल्ल्याचा देखील यात समावेश आहे़ यासाठी युवक स्वराज्य ग्रुपच्या तरुणांनी दोन महिन्यांपासून तयारी सुरू केली होती़ धुळ्यातील मूर्तीकार रवी परदेशी यांच्याकडून किल्ल्यांच्या हुबेहूब दोन प्रतिकृती तयार करुन घेतल्या होत्या़ तसेच धुळे जिल्ह्यात प्रथमच असे प्रदर्शन होत असल्याची माहिती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पांडे यांनी लोकमतला दिली़
शासकीय विद्या निकेतनच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला आहे़ मंडपात प्रवेश करताच शिवाजी महाराजांचे भव्य आणि रुबाबदार पुतळ्याचे दर्शन होते़ आई तुळजा भवानींचे मंदिरही साकारण्यात आले आहे़ तसेच रणगाडा बुरूजही हुबेहूब आहे़ प्रदर्शनस्थळी शिवरायांचे पोवाडे सतत सुरू असल्याने प्रसन्न वाटते़ सायंकाळी प्रोजेक्टरद्वारे शिवरायाचंी तसेच त्यांच्या गड, किल्ल्यांची माहिती तसेच युवा स्वराज्य ग्रुपची माहिती दिली जाते़ एकूणच प्रदर्शनाच्या मंडपात गेल्यावर एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी असल्यासारखे जाणवते़
या प्रदर्शनाला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दोन दिवसात किल्लेप्रेमींसह तीन ते चार हजार नागरीकांनी भेट देवून अभिप्राय नोंदविला आहे़ तसेच धुळे शहरातील शाळांसह ग्रामीण भागातील चितोड, अजंगसह पंधरा ते वीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून पाहाणी केली आहे़ प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आणि सुटी असल्याने रविवरी गर्दी होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांनी सांगितले़
रविवार शेवटचा दिवस असल्याने नागरीकांनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष पुष्कर मगरे, जयेश घाडगे, वैभव पाटील, यश सोलंकी, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, राधा नाईक, हर्षदा बोडके, वृषाली पाटील, सुमित पांडे, शुभम येलमामे, अनुज मराठे, सौरभ नाईक, कृष्णकांत पवार, गोपाल पाटील, मोनार्क गुप्ता, अभिजीत मराठे, चैतन्य घड्याळ, अजय पाटील, विजय पाटील आदींनी केले आहे़
उपक्रमाचे पाचवे वर्ष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या युवकांनी एकत्र येवून युवक स्वराज्य ग्रुपची स्थापना केली़ शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविले जातात़ उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे़ आधीची दोन वर्षे पांझरा चौपाटीवर योगासन आणि सूर्यनमस्काराचे कार्यक्रम झाले़ तिसऱ्या वर्षी ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन देखील प्रसिध्द झाले़ पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेमुळे चौथ्या वर्षी ग्रुपने उपक्रम घेतला नाही़ केवळ शिवरायांना अभिवादन करुन शहरातून मतदफेरी काढली़ यावर्षीचे किल्ले प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले आहे़ तसेच दरवर्षी शिवरंग चित्रकला स्पर्धा होते़ यावर्षी पंचवीस ते तीस शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला़ लवकरच जिल्हास्तरीय तीन आणि शाळास्तरीय तीन पारितोषिके दिली जातील़ सहभागी होणाºया विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळेल़