धुळे - चाळीसगाव कोचची सुविधा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:29+5:302021-01-21T04:32:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : धुळे रेल्वे स्थानकावरील धुळे - चाळीसगाव कोचची सुविधा पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी महिला ...

धुळे - चाळीसगाव कोचची सुविधा पूर्ववत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे रेल्वे स्थानकावरील धुळे - चाळीसगाव कोचची सुविधा पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबतचे निवेदन पावरा यांनी दिले. कोरोनापासून धुळे - चाळीसगाव रेल्वे सेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोचची सुविधा पूर्ववत सुरु करून जिल्हावासीयांना दिलासा देण्याची मागणी पावरा यांनी खासदार सुळे यांच्याकडे केली आहे. यावेळी डॉ. सुवर्ण शिंदे उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी प्रवासी धुळे - चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. प्रवाशांना ही सुविधा देताना रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे - चाळीसगाव रेल्वेला मुंबई, पुण्याचे कोच लावले जातात. नंतर ते दादरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेला लावले जातात. मात्र, ही सुविधा केंद्रीय रेल्वे व्यवस्थापनाने अनपेक्षितपणे बंद केल्याने धुळ्याहून मुंबई, पुणे प्रवास सेवा पूर्णतः बंद पडली असून, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४ , तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात व परतणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. आता मुंबई व पुण्याकडे जाणारी रेल्वे सुविधा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई, पुणे येथे जायचे असल्यास चाळीसगावला जावे लागते. त्यासाठी बुकिंग करावे लागते तसेच नाहक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. रेल्वेसेवा बंद असल्याने उपचारासाठी मुंबई येथे जाणाऱ्या रुग्णांचेही हाल होत असून, ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी पावरा यांनी केली आहे.