धुळे तहसील कचेरीतील गर्दी रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:09 IST2020-03-21T13:09:26+5:302020-03-21T13:09:56+5:30
कोरोनाची भीती : जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेपाठोपाठ उचलले पाऊल, केवळ कामांसाठीच प्रवेश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ आता कचेरी कार्यालयातही होणारी गर्दी रोखण्यात आलेली आहे़ तहसीलदार किशोर कदम यांनी आदेश पारीत करीत अंमलबजावणी सुरु केली आहे़
धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी५ वाजेपर्यंत या ठिकाणी सारखी ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दी करू नये असे आदेश दिलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात किमान ३१ मार्चपर्यंत केवळ तहसील स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय ज्यांचे खरोखरच प्रशासकीय काम असेल अशांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे़ त्यांच्या सोबत जे कोणी असतील अशांना प्रवेश नाकारण्यात येत आहे़ मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र्यपणे नियुक्ती करण्यात आली असून, ओळखपत्र बघूनच कर्मचारी अधिकाºयांना आत सोडण्यात येत आहे. तसेच प्रवेश बंदबाबतचे पत्रक तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेले आहेत.
कोरोनामुळे धुळे ग्रामीण तहसील र्काालयात एक प्रकारे सुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे़ विविध कामांसाठी तालुक्यातून नागरीकांची होणारी गर्दी आता दिसत नव्हती़ विशेष म्हणजे शुक्रवारी फारसे कुणीही आले नसल्याचे सांगण्यात आले़ अधिकारी आणि कर्मचाºयांची वर्दळ देखील फारशी दिसली नाही़
दरम्यान, तहसील कार्यालयात ग्रामीण लोकांचा राबता अधिक प्रमाणात असतो़ गर्दी होत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आलेली आहे़ कामाव्यतिरिक्त इतर कोणालाही तहसील कार्यालयात येण्यास तात्पुरता मज्जाव करण्यात येत आहे़