धुळे तालुक्याची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:22+5:302021-07-31T04:36:22+5:30
भूषण चिंचोरे धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. आता धुळे तालुकाही कोरोनामुक्त झाला आहे. धुळे कोरोनामुक्त होणारा ...

धुळे तालुक्याची कोरोनावर मात
भूषण चिंचोरे
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. आता धुळे तालुकाही कोरोनामुक्त झाला आहे. धुळे कोरोनामुक्त होणारा दुसरा तालुका ठरला आहे. यापूर्वी शिरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
धुळे तालुक्यात २३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. तालुक्यातील शिरुड येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा साक्री येथे कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १४ दिवस विलगीकरणात राहून त्या तरुणाने कोरोनावर मात केली होती. तसेच्या त्याच्या परिवारातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. त्यानंतर मे महिन्यापासून तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता.
तालुका कोविड केंद्रात १ हजार ४२८ रुग्ण झाले बरे -
धुळे तालुक्यातील रुग्णांसाठी चार कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. पहिल्या लाटेत एक कोविड केअर सेंटर होते. दुसऱ्या लाटेत त्यात आणखी तीन केंद्रांची भर पडली होती. २० एप्रिल २०२० रोजी सुरू झालेल्या बाफना मेमोरिअल कोविड केअर सेंटरमध्ये सर्वाधिक रुग्णांनी उपचार घेतले. या केंद्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ हजार ३४, तर दुसऱ्या लाटेत २६९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. दुसऱ्या लाटेत सुरू झालेल्या कुसुंबा कोविड केंद्रात ६३ रुग्णांनी उपचार घेतला. आर्वी कोविड केअर केंद्रात ६३, तर सोनगीर केंद्रात दोन रुग्ण दाखल होते.
पहिल्या लाटेत 'हॉटस्पॉट' -
तालुका कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठा हॉटस्पॉट ठरला होता. लॉकडाऊन झाल्याने घरी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी होती. तालुक्यातील महामार्गावर असलेल्या ज्या गावातून परप्रांतीय मजुरांचे जत्थे गेले होते त्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती. तसेच इतर तालुक्यांच्या तुलनेत मृत्युदरही अधिक होता.
१५ दिवसांपासून रुग्ण नाही -
मागील १५ दिवसांपासून धुळे तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. यापूर्वी १५ जुलै रोजी लोणखेडी येथील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.
१३९ रुग्णांचा मृत्यू -
धुळे तालुक्यातील ५ हजार १९४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ५०५५ रुग्ण बरे झाले आहेत, तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कापडणे, कुसुंबा या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक होती.
आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत -
तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आल्याचा आनंद आहे. सर्व्हेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व बाधित रुग्णावर उपचार याप्रक्रियेत मागील दीड वर्षांपासून आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत.
- डॉ. तरन्नुम पटेल, तालुका आरोग्य अधिकारी
ग्राफसाठी
धुळे तालुक्यातील कोविड केअर केंद्र
बाफना हॉस्पिटल
दाखल रुग्ण - १३०३
बरे झालेले रुग्ण - १३०३
कुसुंबा
दाखल रुग्ण ६३
बरे झालेले रुग्ण ६३
आर्वी
दाखल रुग्ण ६३
बरे झालेले रुग्ण ६३
सोनगीर
दाखल रुग्ण ०२
बरे झालेले रुग्ण ०२