धुळे: एसटी आणि कंटेनर भीषण अपघातात १३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:40 IST2019-08-19T13:33:21+5:302019-08-19T14:40:42+5:30
बस अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची मदत :

अपघातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झालेला आहे.
धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा)- शहादा मार्गावरील निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या बस व कंटेनर अपघातातील मृतप्रवाशांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताच्या वेळी मंत्री श्री. रावल यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.
औरंगाबाद- शहादा बसला दोंडाईचा- शहादा मार्गावरील निमगूळ गावाजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ प्रवासी गंभीर जखमी असून १४ प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी होते. जखमी व मृतांना रुग्ण वाहिकेतून दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींना धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दोन मृतदेह आणण्यात आले. जखमींमध्ये मोतीलाल रामदास साठे ( ४८ ) ज्योती मोतीलाल साठे (४०), योगेश मोतीलाल साठे ( १८ ), तुषार मोतीलाल साठे (१३), मुपो लोणखेडा ता.शहादा, शेख शहानाज शेख अमानुद्दीन ( ५० ) शहादा शकिल पिंजारी शहादा,कांतीलाल मुरार हालकरी( ३४ ) शिरूर दिगर ता.शहादा बस वाहक जाकीर दरबार पिंजारी, ( ४०) , जगदीश दत्तात्रय भावसार, ( ३७ ), सुनीता जगदीश भावसार (३५ ), मुमताज इमरान ईराणी, इमरान रशीद ईराणी, ईरम ईमराम ईराणी, सर्व शहादा ता.शहादा. शेख हारून शेख दगडू ( ३५ ) धुळे, सूरज प्रताप हारदे ( २७ ) ,रईस अब्बास पिंजारी,३७ शिवाजी नगर वडजाई ता धुळे,सागर पांडुरंग वाघमोडे ( २५ ) धुळे, निंबा वनजी चौधरी ( ५४ ) हिराबाई निंबा चौधरी ( ४२ ) मु.पो.डोंगरगाव,ता.शहादा,टिला मुरल्या पावरा वय ( ३५ ) दाऊसिंग पहाडसिंग नाईक ( ३४ ) मु.पो.तोरणमाळ,ता.शहादा महेंद्र बाळू बागल ३५ निमगूळ ता.शिंदखेडा, वितला मुरला पावरा खडकी ,तोरणमाळ ता.शहादा, बंछा हमऱ्या पावरा झापी,तोरणमाळ ता.शहादा, जाकीर दरबार पिंजारी ३६ मांडळ, ता.शिंदखेडा यांचा समावेश आहे.जखमी प्रवाश्यांवर उपचार सुरु आहेत.
मयतांमध्ये बस चालक मुकेश नगीन पाटील वय ( ४० ), वृषाली दिपक भावसार ३५, तेजस जगदीश भावसार ( १४ ) शकील महंमद बागवान, प्रेरणा श्रीराम वंजारी , सौरभ श्रीराम वंजारी, सुयोग बन्सीलाल नहाटा,इद्रीस नासीर मन्यार सर्व राहणार शहादा, संजय ताराचंद अलकारी रा.शिरूड ता.शहादा. हस्तिक आनंद वाघ चौरे ठाणे, सोमनाथ धोंडू पाटील,चाळीसगाव जि.जळगाव.मनीषा महेंद्र बागल ( ३२) निमगूळ, ता शिंदखेडा,यांचा समावेश आहे.
आज सकाळी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात ११ मृतदेहांचे विच्छेदन करुन ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रे, डॉ. महेश भडांगे, डॉ. रोहन थोरात आदींनी मृतदेहांचे विच्छेदन केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे याशिवाय मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये, तर जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली आहे. मृत प्रवाशांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे दहा लाख रुपयांची मदत करण्यात तसेच बस अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना मंत्री रावल यांनी प्रत्येकी वैयक्तिक दहा हजार रुपयांची मदत केली आहे.