धुळे : महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. शुक्रवारी एकूण १९९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता ७४ जागांसाठी ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाने ४ जागा बिनविरोध जिंकून बाजी मारली असली, तरी पक्षांतर्गत बंडखोरी शमवण्यात मात्र पक्षाला अपयश आल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपचे अमोल मासुळे बिनविरोध
निवडणूक प्रक्रियेत भाजपने सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. शुक्रवारी प्रभाग १७ 'अ' मधून अमोल पावबा मासुळे यांनी बिनविरोध विजय मिळवला. त्यांच्या रूपाने भाजपचे एकूण ४ उमेदवार आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान शेवटच्या दिवशी कोण माघार घेऊन किती जागा बिनविरोध होतील, याकडे लक्ष लागून आहे.
अवघ्या ३ मिनिटांनी हुकली माघार
प्रभाग क्रमांक ८ मधून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवरून सोनाली सोनवणे यांनी अर्ज भरला होता. मात्र त्या अचानक माघार घेणार असल्याची कुणकुण शिंदेसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे आणि आनंद लोंढे यांना लागली. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती.
शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना उमेदवार सोनाली सोनवणे आणि त्यांचे पती प्रवीण सोनवणे जुन्या मनपा निवडणूक कार्यालयात दाखल होणार होते. याची माहिती मिळताच वाल्हे आणि लोंढे यांनी निवडणूक केंद्रावर धाव घेतली.
अर्ज मागे घेण्यास केवळ ३ मिनिटे शिल्लक असताना वाल्हे आणि लोंढे यांनी उमेदवार व त्यांच्या पतीला माघार का घेताय? नेमकं कारण काय?" अशा प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या चर्चेत आणि विनवण्यांमध्ये माघारीची मुदत मुदत संपली.
या विलंबामुळे शिंदेसेनेचे उमेदवाराचा अर्ज कायम राहिला आणि त्या आता निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. या नाट्यमय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या 'फिल्डिंग'मुळे एका उमेदवाराची माघार रोखली.
Web Summary : BJP secured four Dhule municipal seats unopposed. Despite 199 withdrawals, 316 candidates compete for 74 seats. Internal strife persists within the BJP.
Web Summary : भाजपा ने धुले नगर निगम की चार सीटें निर्विरोध जीतीं। 199 नाम वापस लेने के बावजूद, 74 सीटों के लिए 316 उम्मीदवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। भाजपा में आंतरिक कलह जारी है।