धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:19 IST2020-06-29T21:18:58+5:302020-06-29T21:19:18+5:30
लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरी, चर्चेमध्ये सहभाग या आधारे सगळ्या खासदारांमध्ये भारतात दुसरा नंबर

धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार
धुळे : देशाच्या संसदरत्न पुरस्कार कमिटीने १७ व्या लोकसभेसह राज्यसभेतील १० खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला आहे. त्यात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
लोकशाहीत संसद हे एक मंदिर असते व पूर्ण देशाचे प्रश्न येथे मांडले जातात, कायदे बनविले जातात त्या अनुषंगाने येथे अतिशय महत्वपूर्ण चर्चा व वादविवाद होते. त्यामुळे जे खासदार मोठ्या प्रमाणात या वादविवादामध्ये भाग घेतात व जनसामान्याच्या कल्याणाशी जोडलेले प्रश्न सभागृहात मांडतात व सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतात. असे सगळ्यात प्रभावशाली खासदारांना पुरस्कार दिला गेला पाहिजे, असे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाटत होते़ त्यांच्या आग्रहास्तव पुरस्कार देण्याचा उपक्रम सुुरु करण्यात आला़ त्या प्रमाणे १४ व्या, १५ व्या, १६ व्या लोकसभेच्या वेळेस प्रभावी खासदारांना पुरस्कार दिले गेले होते.
१७ व्या लोकसभेच्या (आताच्या) विविध कार्यात प्रश्न विचारणे, वेगवेगळ्या चर्चेत भाग घेणे, त्यात पहिला नंबर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो व भारतात दुसरा नंबर खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा लागतो. त्यांनी १७ व्या लोकसभेत एका वर्षात (लोकसभेच्या कार्यकाळात) एकूण २०२ प्रश्न हे जनसामान्यांच्या हितांचे मांडले व वेगवेगळ्या वादविवादामध्ये सहभाग घेतला.
संसदरत्न पुरस्कार देण्याचे निकष
संसदेतील उपस्थिती, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग, सभागृहात प्रश्न विचारणे आणि सभागृहातील विविध चर्चेत सहभाग घेणे हे काही निकष होते़ हे निकष डोळ्यासमोर ठेऊन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला. हे निकष डॉ़ भामरे यांनी पार केले़
तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी १६ व्या लोकसभावेळी देशाचे संरक्षण राज्यमंत्री पद उत्तम प्रकारे सांभाळले आहे. तसेच वेळोवेळी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़