१११ टक्के लसीकरण : प्राप्त लक्ष्यापेक्षा अधिक लसीकरण करण्यात यंत्रणेला यश
धुळे - कोरोना लसीकरणात जिल्ह्याची कामगिरी दमदार राहिली आहे. गुरुवारी झालेल्या कोरोना लसीकरणात धुळ्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दररोज सुरू असलेल्या लसीकरणात बहुतांशवेळा प्राप्त उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. आतापर्यंत १०९ टक्के इतके लसीकरण झालेले आहे. आठ दिवसांत ३ हजार ९०० इतक्या लसीकरणाचे लक्ष्य होते. मात्र, ४ हजार २५१ इतके लसीकरण करण्यात यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ५४० लस प्राप्त झाल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात १२ हजार ४३० व दुसऱ्या टप्प्यात १० हजार ११० लस मिळाल्या आहेत.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना व आशा स्वयंसेविका यांना कोरोनाची लस टोचण्यात येत आहे. यात खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लस आल्यानंतर सुरुवातीला लस टोचून घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण होते. मात्र, आता आरोग्य कर्मचाऱ्यांची भीती दूर झाली असून लस टोचून घेण्यासाठी ते सरसावले आहेत.
या ठिकाणी सुरू आहे लसीकरण - जिल्हा रुग्णालयात सुरुवातीला लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या प्रभातनगर आरोग्य केंद्र, मच्चीबाजार येथील आरोग्य केंद्र, सॆई ग्रामीण रुग्णालय, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा, शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पहिल्या टप्प्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
लसीकरणात महिलांचे प्रमाण -
लसीकरण झाल्यानंतर किती महिलांनी लस घेतली किंवा किती पुरुषांनी लस घेतली अशी वर्गवारी करण्यात येत नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
डोसचा दुसरा साठाही मिळाला -
१ - कोरोना लसीचा दुसरा साठाही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पहिला साठा प्राप्त झाला त्यावेळी १२ हजार ४३० लस जिल्ह्यासाठी मिळाल्या होत्या. तर दुसऱ्या साठ्यात १० हजार ११० लस प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून लसीकरण केल्या जाणाऱ्या केंद्रांमध्ये वाढ होत आहे.
२- भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनीही कोरोनाची लस टोचून घेतली. गुरुवारी शहरातील प्रभातनगर येथील आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी लस घेतली. डॉ. निर्मलकुमार रवंदळे व नोडल अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांनीही यावेळी लस घेतली. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसून लस पूर्णपणे सुरक्षित व जीवनरक्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
३ - जिल्ह्यात बहुतेकवेळी प्राप्त लक्ष्यापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. त्यामुळेच धुळे जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणात आघाडी घेतली आहे. गुरुवारीदेखील १११ टक्के इतके लसीकरण झाले होते.
प्रतिक्रिया -
जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज होणाऱ्या लसीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धुळ्याने आघाडी घेतली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लस टोचून घेण्याबाबत कोणतीही भीती नाही. लस पूर्णपणे सुरक्षित आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण -
२३ जानेवारी - १०८ टक्के
२५ जानेवारी - १४४ टक्के
२७ जानेवारी - ११९ टक्के
२८ जानेवारी - १११ टक्के
कुठे किती लसीकरण -
धुळे जिल्हा - १११ टक्के लसीकरण
बीड जिल्हा - ११० टक्के लसीकरण
नांदेड जिल्हा - ९२ टक्के लसीकरण
सिंधुदुर्ग जिल्हा - ९२ टक्के लसीकरण
लातूर जिल्हा - ९१ टक्के लसीकरण