धुळे जिल्हयात फक्त ३१ सार्वजनिक मंडळांनी घेतले अधिकृत वीज कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:52 IST2019-11-10T20:52:17+5:302019-11-10T20:52:34+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला महावितरणला ‘शॉक’

धुळे जिल्हयात फक्त ३१ सार्वजनिक मंडळांनी घेतले अधिकृत वीज कनेक्शन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात लहान-मोठे मिळून एकूण ५१३ मंडळांनी हा उत्सव साजरा केला. हा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले होते. मात्र सार्वजनिक मंडळांनीच महावितरणला ‘शॉक’ दिला आहे. जिल्ह्यात ५१३ पैकी अवघ्या ३१ मंडळांनीच अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले.
गणेशोत्सवात अनेक मंडळांचा विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले होते. त्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांना सवलतीच्या दरातच वीज देण्यात येणार होती. तसेच अनधिकृत वीज कनेक्शन रोखण्यासाठी भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. आकोडे टाकून वीज घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महावितरणलाच ‘शॉक’ दिला आहे. जिल्ह्यात १७ पोलीस स्टेशन अंतर्गत २८८ लहान व १६४ मोठे सार्वजनिक, ५९ गावात एकगाव एक गणपती अशी एकूण ५१३ मंडळांनी उत्सव साजरा केला. मात्र यापैकी अवघ्या ३१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृत वीज पुरवठा घेतल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली आहे. यातील काही मंडळांनी वीज पुरवठ्यासाठी जनरेटरचा वापर केला असण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक मंडळांनी अनिधिकृत वीज कनेक्शन घेऊनच हा उत्सव जल्लोषात साजरा केल्याचे दिसून येत आहे.
भरारी पथक निष्क्रिय
वीज चोरीला आळा बसावा म्हणून महावितरणतर्फे भरारी पथकाची नियुक्ती केली होती. असे असतांनाही जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेतलेले नाही. त्यामुळे भरारी पथकाने नेमकी काय तपासणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
दरम्यान जिल्ह्यात किती मंडळांनी वीज पुरवठा घेतला याची माहिती महावितरणकडे मागितली असता, एक महिना त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.