धुळे जिल्ह्यात केवळ २८ टक्के रब्बीची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 11:28 IST2018-12-05T11:27:33+5:302018-12-05T11:28:45+5:30
अल्प पावसाचा परिणाम, सर्वात कमी पेरणी धुळे तालुक्यात

धुळे जिल्ह्यात केवळ २८ टक्के रब्बीची पेरणी
धुळे : यावर्षी झालेल्या अल्प पावसाचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झालेला आहे. जिल्ह्यात ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त २७ हजार ८९५ .५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी अवघी २८.४६ टक्के एवढी आहे. गेल्यावर्षी १३७.२० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातुलनेत यावर्षी तब्बल १०८ टक्के रब्बी पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाने असमाधानकारक हजेरी लावली. त्यातच मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने मोठा खंड दिल्याने, त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने, खरीपाचे अपेक्षित उत्पन्न आलेच नाही. कमी पावसामुळे नोव्हेंबरमध्येच अनेक ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडू लागल्या आहेत. तसेच तलावांतील जलसाठ्याची स्थितीही नाजूक आहे. कमी पावसाचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झालेला आहे.
कृषी विभागातर्फे जिल्ह्यात यावर्षी ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २७ हजार ८९५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
यंदा ज्वारी, गहू,
हरभºयाचे क्षेत्र घटले
जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीचे उद्दिष्ट १३ हजार ९८४ हेक्टर एवढे होते. प्रत्यक्षात ३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, ज्वारीचे क्षेत्रे १० हजार १४९ हेक्टरने घटले आहे. साक्री तालुक्यात रब्बी ज्वारीची लागवडच झाली नाही. तीच स्थिती गव्हाची आहे. गव्हाची लागवड ४३ हजार ९८७ हेक्टरवर होईल असे उद्दिष्ट होते.मात्र केवळ ९ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली असून, उद्दिष्टापेक्षा थोडीथोडके नव्हे तर तब्बल ३३ हजार ९९४ हेक्टर क्षेत्र गव्हाचे घटले आहे. रब्बी मक्याचे लागवडीचे उद्दिष्ट ६ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र होते. मात्र केवळ ४०८.५ हेक्टर क्षेत्रावरच मक्याची लागवड करण्यात आली. यात ६ हजार ५८ हेक्टर क्षेत्राची घट आहे. हरभºयाची लागवड ३२ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर होईल असे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १३ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावरच हरभºयाची लागवड झालेली आहे. हरभरा लागवडीत १९ हजार १४५ हेक्टरची घट असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सर्वात कमी पेरणी
धुळे तालुक्यात
यावर्षी रब्बीची सर्वात कमी पेरणी धुळे तालुक्यात झालेली आहे. तालुक्यात १७ हजार ४४४ हेक्टरपैकी अवघी १ हजार ७४७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी १०.१ एवढी आहे. त्या खालोखाल कमी पेरणी शिंदखेडा तालुक्यात झालेली आहे.
या तालुक्यात २८ हजार ८२६ हेक्टरपैकी ४ हजार ८६.५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी १४.१८ एवढी आहे. तर सर्वाधिक पेरणी साक्री तालुक्यात झाली आहे. येथे २२ हजार ३५ पैकी ९ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असून, त्याची टक्केवारी ४५.३० टक्के आहे. शिरपूर तालुक्यात पेरणीची टक्केवारी ४०.६५ टक्के आहे.