धुळे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला आठ महिन्यात दीड कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:27 IST2019-08-20T11:25:51+5:302019-08-20T11:27:34+5:30
वीज वाहिनींवरील १ हजार ८२ पोल व ४३ रोहित्र पडले, सबस्टेशनवरील ट्रान्सफार्मरही पडले

धुळे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला आठ महिन्यात दीड कोटींचा फटका
अतुल जोशी।
आॅनलाइन लोकमत
धुळे : पूर, वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना नुकसान सोसावे लागत असते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात महावितरण कंपनीलाही नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या आठ महिन्यात उच्चदाब, लघुदाब वाहिनीवरील पोल पडणे, रोहीत्र जळणे यामुळे महावितरण कंपनीला सुमारे १ कोटी ४१ लाख रूपयांचा फटका बसल्याची माहिती महावितरण कंपनी कार्यालयातून देण्यात आली.
आता गावातील प्रत्येक घरापर्यंत, शेती, पाड्यांपर्यंत वीज पोहचलेली आहे. त्यामुळे महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. वीज पुरवठ्यासाठी जागोजागी विद्युत खांब उभे केले जातात. रोहीत्र बसविले जातात. उच्चदा, लघुदाब वाहिनीद्वारे सर्वत्र वीज पुरवठा केला जात असतो.
पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पोल पडतात, तारा तुटतात.
काहीवेळेस रोहीत्र जळण्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे महावितरण कपंनीलाही त्याचा आर्थिक फटका बसत असतो.
धुळे जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण कंपनीला १ कोटी ४१ लाखांचा फटका सोसावा लागला आहे. सर्वाधिक नुकसान हे इलेक्ट्रीक पोलचे झालेले आहेत. यात उच्चदाब वाहिनीवरील ३७९ तर लघुदाब वाहिनीवरील ७०३ पोल पडले. तर वादळामुळे रोहीत्र पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांमध्ये वादळामुळे जवळपास ४३ रोहीत्र पडले. त्याची किंमत १२ लाख ९८ हजार रूपये आहे. तर सबस्टेशनवरील पॉवर ट्रान्सफार्मर पडल्याने सुमारे १५ लाखांचा फटका बसला. त्याचप्रमाणे या आठ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात ३६ रोहीत्र जळाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महावितरणला ३६ लाख ५६ हजाराचे नुकसान सोसावे लागल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली.