महाआवास अभियानात धुळे जिल्हा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:28+5:302021-09-08T04:43:28+5:30
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात ...

महाआवास अभियानात धुळे जिल्हा प्रथम
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात शंभर दिवसांचे महाआवास अभियान ग्रामीण सुरू करण्यात आले. या अभियानाअंतर्गत नाशिक विभागात सर्वोत्कृष्ट कार्य करत धुळे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेत ७२.५० गुण मिळवित धुळे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ६३.४० गुणांसह अहमदनगर जिल्हा दुसऱ्या स्थानी, तर ५०.९० गुणांसह जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून ४९.६९ गुणांसह अहमदनगर जिल्ह्याने पहिला, तर ४८.६६ गुण मिळवित धुळे जिल्हा दुसरा व ३९.६७ टक्के गुणांसह नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नुकताच नाशिक विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब मोहन यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपायुक्त अरविंद मोरे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक प्रकल्पचे संचालक उज्ज्वला बावके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.