धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:23 IST2020-08-05T11:23:16+5:302020-08-05T11:23:48+5:30
केळीच्या पट्टयातही कापूस लागवडीला प्राधान्य

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस असला तरी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य याच्या मानाने फळपीक व भाजीपाला लागवड तुलनेने खूपच कमी आहे. यावर्षी आतापर्यंत फळपिके १ हजार ३५८.३ तर भाजीपाला ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे केळी, मिरची या पट्यातही आता शेतकरी कापूस लागवडीकडेच जास्त प्रमाणात वळलेले आहे.
गेल्यावर्षाचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांपासून धुळे जिल्ह्यात दुुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पाण्याची कमतरता असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिके लागवडीलाच प्राधान्य दिलेले आहे.
जिल्ह्यात जवळपास ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. यावर्षी तृणधान्याची १ लाख ३३ हजार ७८२ हेक्टरवर, कडधान्याची २४ हजार ७३० तर गळीत धान्याचे २९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान जिल्ह्यात मोजक्या भागातच पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागातच भाजीपाला व फळपिकांची शेती करण्यात येते.
यावर्षी खरीप हंगामात फळ पिकाची अवघ्या १ हजार ३५८.३ हेक्टर क्षेत्रावर लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यात आंबा २१५.५ हेक्टर, केळी ३२४, सीताफळ १२७, कागदी लिंबू ६२.७, मोसंबी ७.५ पपई ४४२ व इतर फळपिके १८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.
फळपिकांच्या मानाने भाजीपाल्याची लागवड जास्त आहे. विशेषत: धुळे तालुका व साक्री तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.
जिल्ह्यात सर्वाधिक लागवड मिरचीची करण्यात आली आहे. ९९३ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झालेली आहे. त्या खालोखाल कांद्याची लागवड ७८७ हेक्टर, टोमॅटो ३२१, वांगी २०६, कोबी २२१, वाटाणा ४३, व इतर भाजीपाला २ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे.