मानवी निर्देशकांत धुळे जिल्हा मागे : पालक सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:53+5:302021-01-22T04:32:53+5:30
पालक सचिव श्रीमती लवंगारे-वर्मा गुरुवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूसह विविध विभागांचा ...

मानवी निर्देशकांत धुळे जिल्हा मागे : पालक सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा
पालक सचिव श्रीमती लवंगारे-वर्मा गुरुवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूसह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. लवंगारे-वर्मा म्हणाल्या, शेतीपूरक उद्योग, व्यवसायांसाठी प्रोत्साहन द्यावे. यातून रोजगाराची शाश्वत संधी निर्माण झाल्यास मजुरांच्या स्थलांतराला निश्चित आळा बसेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय संवेदनशीलपणे हाताळावा. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला लाभ मिळवून द्यावा. प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्यात तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी. ‘माझी वसुंधरा’ अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत वृक्षारोपण वाढवावे, अशाही सूचना पालक सचिव लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. आता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या खरीप हंगामात ५२ हजार ७५२ शेतकऱ्यांना ४४९ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रास भेट
पालक सचिव श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विविध विभागांची माहिती जाणून घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी कोविड लसीकरणाची माहिती दिली.