धुळे जिल्ह्यात 14 लाख 34 हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 12:42 IST2017-07-08T12:42:55+5:302017-07-08T12:42:55+5:30
7 जुलै रोजी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे.

धुळे जिल्ह्यात 14 लाख 34 हजार वृक्षांची लागवड
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.8 - जिल्ह्यात 7 जुलै रोजी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख 34 हजार 885 वृक्षांची लागवड झाल्याची माहिती वन विभागाचे उप वन संरक्षक जी.के. अनारसे यांनी दिली.
जिल्ह्याला 1 ते 7 जुलै दरम्यान 8 लाख 2 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रशासनाने सदर उद्दीष्टानुसार वृक्ष लागवडीसाठी 3 हजार 77 स्थळ निश्चित केली होती. यासाठी लॅन्डबॅक बुकलेट तयार करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील समन्वय अधिकारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक असलेली समन्वय अधिकारी पुस्तिका तयार करण्यात आली होती.
याशिवाय जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वृक्ष लागवडीसाठी प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविण्यात आली. पथनाटय, चित्ररथ, वृक्ष दिंडी, बस स्थानकावर जिगंल्स प्रसारण, दुरचित्रवाणी प्रासरण, होर्डीग्ज, जाहीरात फलक, डिजीटल बोर्ड याद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली होती.
नागरी वस्ती असलेल्या परिसरात सुद्धा वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाकडून 25 जुन ते 5 जुलैर्पयत रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात आला. सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री येथे वन महोत्सव केंद्र सुरु करण्यात आले होते. अशा 9 वन महोत्सव केंद्रातून रोपे विक्री करण्यात आली.
जिल्ह्यात वन विभागाच्या 29 , सामाजिक वनीकरण 4 अशा एकूण 22 रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात 8 लाख 2 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट असतांना प्रत्यक्षात 14 लाख 54 हजार खड्डे खोदून त्यामध्ये 7 जुलै अखेर रोपे लागवड पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती उप वन संरक्षक जी.के.अनारसे यांनी दिली.