केवळ ३ तंत्रज्ञावर सुरू आहे धुळे कोरोना प्रयोगशाळेचा गाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST2021-03-05T04:35:49+5:302021-03-05T04:35:49+5:30
जिल्ह्यात जेव्हा सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढले होते. तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेत १५ ते १६ तंत्रज्ञ कार्यरत होते. ...

केवळ ३ तंत्रज्ञावर सुरू आहे धुळे कोरोना प्रयोगशाळेचा गाडा
जिल्ह्यात जेव्हा सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढले होते. तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेत १५ ते १६ तंत्रज्ञ कार्यरत होते. त्यामुळे त्यावेळेस दररोज येणाऱ्या अहवालाचे रिपोर्ट लगेच मिळत होते. पण नंतर हळूहळू प्रयोगशाळेतील अहवालाचे प्रमाण अगदीच घटले. त्यामुळे प्रयोशाळेतील तंत्रज्ञावर अन्य जबाबदारी सोपविण्यात आली. आता प्रयोगशाळेत केवळ तीन तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्यात आता अचानक पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा दिवसात हे प्रमाण अचानक खूप वाढले आहे.
दररोज टेस्टिंगसाठी येणाऱ्या अहवालाची संख्या ही वाढली आहे.
दररोज सरासरी ६०० अहवाल - जिल्ह्यातून आणि शेजारील नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातूनही अहवाल प्राप्त होते. सध्या प्रयोगशाळेत दररोज सरासरी ६०० अहवाल प्राप्त होत आहे. प्रयोगशाळेत केवळ तीन तंत्रज्ञ असल्याने दिवसभरात सतत काम करूनसुद्धा ३५० अहवालांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रलंबित राहणाऱ्या अहवालाची संख्या वाढून ३०० वर पोहोचली आहे.
धुळे सोबतच शेजारील जळगाव जिल्ह्यातसुद्धा झपाट्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. तेथील प्रयोगशाळेतसुद्धा अहवालाची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे पेंडिंग अहवालांचीही संख्या वाढली आहे. तेथील प्रयोगशाळेतील काम वाढल्यामुळे धुळे कोरोना प्रयोगशाळेतील काही तंत्रज्ञ हे जळगावला पाठविले आहेत. त्यामुळे धुळे प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाची संख्या कमी होण्यामागील हे एक कारण सांगता येऊ शकते. एकूणच धुळे प्रयोगशाळेचे गाडं आता केवळ तीन तंत्रज्ञावर सुरू असल्याची परिस्थिती आहे.
प्रयोगशाळेत कोरोना वाढत असताना १५ ते १६ तंत्रज्ञान होते. त्यामुळे त्यावेळेस अहवालाचा रिपोर्ट लगेच देता येत होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची नियुक्ती अन्य ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर आता अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अहवालांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आता प्रयोगशाळेत केवळ तीन तंत्रज्ञ आहेत. ते सर्व कार्यरत असून प्रयोगशाळेत दररोज ३५० अहवाल तपासण्याची क्षमता आहे. परंतु आता दिवसाला सरासरी ६०० अहवाल प्राप्त होत असल्याने पेंडिंग अहवालाची संख्या वाढली आहे. आम्ही तंत्रज्ञांची मागणी केली आहे.
- डॉ. माधुरी कलाल,
कोरोना प्रयोगशाळा प्रमुख, धुळे