धुळे शहरात कोरोनाचे सर्वाधिक ६७ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण शिंदखेडा तालुक्यात केवळ ७ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:38+5:302021-01-22T04:32:38+5:30
धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यासोबतच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. ...

धुळे शहरात कोरोनाचे सर्वाधिक ६७ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण शिंदखेडा तालुक्यात केवळ ७ बाधित रुग्ण
धुळे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यासोबतच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १७६ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात कोरोनाचे ११७ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, धुळे शहरातील रुग्णांचे प्रमाण जास्तच आहे. चार तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची रुग्णसंख्या दोन अंकी संख्येत आहे तर शिंदखेडा तालुक्यातील रुग्णसंख्या एक अंकी संख्येत पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपेकी ६६.४७ टक्के रुग्ण धुळे शहरात आहेत तर शिंदखेडा तालुक्यात ३.९७ टक्के कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
धुळे शहरात ११७ रुग्ण - धुळे शहरात ११७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. धुळे शहरात आतापर्यंत ७ हजार ६१ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत तर १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे तालुक्यात १०.७९ टक्के रुग्ण - धुळे तालुक्यात जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी १०.७९ टक्के रुग्ण सध्या आहेत. तालुक्यातील १९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ७१५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १ हजार ६२२ रुग्ण बरे झाले असून, ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यातील मृत्यूदर ४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
शिरपूर तालुक्यात २२ रुग्ण - शिरपूर तालुक्यात सध्या २२ बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी १२.५ टक्के रुग्ण तालुक्यात आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या दोनपर्यंत खाली गेली होती. मात्र, रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे.
शिंदखेडा तालुक्यात सर्वात कमी रुग्ण - शिंदखेडा तालुक्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यातील ७ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपेकी केवळ ३.९७ टक्के रुग्ण शिंदखेडा तालुक्यात आहेत.
साक्रीत ११ रुग्ण - साक्री तालुक्यात ११ बाधित रुग्ण आहेत. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ३९७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार ३५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांपैकी ६.२५ टक्के रुग्ण साक्री तालुक्यात आहेत.