महामार्गावरील हॅाटेलमध्ये तिघांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:11 IST2021-03-28T21:11:09+5:302021-03-28T21:11:26+5:30
मोहाडी पोलीस : दोन ताब्यात एक फरार

महामार्गावरील हॅाटेलमध्ये तिघांचा धुडगूस
धुळे : महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बळजबरीने प्रवेश करीत बळजबरीने रुम देण्याचे धमकाविले. रुम देण्यास नकार दर्शविताच हाॅटेल व्यवस्थापकाला दमदाटी करण्यात आली. मोहाडी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. हा प्रकार रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेवून तिसऱ्याने पळ काढला. तिघांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल झाला.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याची अंमलजावणी मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कठोर स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यामुळे धुळ्यानजिक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेले हॉटेल बंदच आहेत. हे माहित असताना सुध्दा तीन जणं रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास शहरानजिक अवधान एमआयडीसीनजिक एका हॉटेलमध्ये आले. काऊंटरवरील व्यवस्थापकाला रुम देण्याबाबत धमकाविले. त्यांनी नकार देताच शिवीगाळ करीत दमदाटी करण्यात आली. त्याचवेळेस घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता हाताबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी करीत धक्काबुक्की केली. दहशत निर्माण करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी धिरज घनश्याम गवते यांनी रविवारी पहाटे ५ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, योगेश उर्फ न्हानू संजय गवळी, लखन बन्सीलाल नेरकर, कुणाल अर्जून गवळी (रा. गवळीवाडा, मोगलाई, साक्री रोड, धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ४५२, २६९, १८८, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण अंधाराचा फायदा घेत पळून गेला आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील करीत आहेत.