आरक्षण हक्क कृती समितीचा मंत्रालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST2021-09-06T04:40:05+5:302021-09-06T04:40:05+5:30
धुळे : मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मागासवर्गीय संघटना, समाज, विद्यार्थी, ...

आरक्षण हक्क कृती समितीचा मंत्रालयावर धडक मोर्चा
धुळे : मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मागासवर्गीय संघटना, समाज, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचा २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी शिवानंद बैसाणे यांनी दिली.
आरक्षण हक्क समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता; परंतु शासनाने या मोर्चाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात मागासवर्गीयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता २७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व एससी, एसटी, डीटी, एनटी, एसबीसी, ओबीसी समाज घटक, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या संघटनांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीची कोअर कमिटी, राज्य प्रतिनिधी, जिल्हा निमंत्रक व समन्वयक यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच धडक मोर्चाच्या जनजागृती व व्यापक सहभागासाठी विभागीय, जिल्हा, तालुकास्तरीय बैठका या महिन्यात होणार आहेत. तसेच सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची राज्यस्तरीय गोलमेज परिषदसुद्धा होणार आहे. या परिषदेला कोअर कमिटी सदस्य तथा राज्य निमंत्रक माजी आमदार हरिभाऊ राठोड, सुनील निरभवने, अरुण गाडे, एस. के. भंडारे, एन. बी. जारोंडे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, संजीवन गायकवाड, डॉ. नितीन कोळी, शरद कांबळे, डॉ. संजय कांबळे बापेरकर, संजय घोडके, प्रा. मधुकर उईके, अनिलकुमार ढोले, संजय खामकर, फरेंद्र कुतिरकर, राजकुमार जवादे, डॉ. बबन जाधव, सुरेश पवार, शामराव जवंजाळ, अरुण जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल.
मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य सदस्य व धुळे जिल्हा समन्वयक शिवानंद बैसाणे, जिल्हा आरक्षण हक्क कृती समितीचे दीपक शिंदे, राजेंद्र भामरे, सुरेंद्र पिंपळे, किशोर पगारे, ज्ञानेश्वर पवार, चंद्रकांत सत्तेसा, भूपेश वाघ, रवींद्र मोरे, कुणाल वाघ, गौतम साळवे, रोहिदास गायकवाड, रा. का. पाटील, नंदुरबार जिल्हा आरक्षण हक्क समितीचे अशोक बच्छाव, ज्ञानेश्वर इंदासराव, राजेंद्र सूर्यवंशी, मनोज सोनवणे, विकास गांगुर्डे, प्रवीण देसले व जितेंद्र पाटील यांनी केले आहे.