देवपुरात चौघांनी टाकला दरोडा हातपाय बांधून ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:14 IST2020-07-28T22:14:30+5:302020-07-28T22:14:53+5:30

भूजल कॉलनीतील थरार : पती-पत्नी भेदरले, श्वान पथकासह ठसे तज्ञ दाखल

In Devpur, the four robbed him, tied his hands and feet and took away the loot | देवपुरात चौघांनी टाकला दरोडा हातपाय बांधून ऐवज लांबविला

देवपुरात चौघांनी टाकला दरोडा हातपाय बांधून ऐवज लांबविला

धुळे : पती-पत्नींचे हातपाय बांधून घरात शिरुन चार दरोडेखोरांनी रोकड आणि दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना देवपुरातील भूजल कॉलनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली़
देवपुरातील पंचवटी गॅस गोडावूनच्या बाजुला असलेल्या भुजल कॉलनीत मु्स्ताक पिंजारी यांचे निवासस्थान आहे़ ते कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतात़ मंगळवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा बाथरुमसाठी बाहेर गेल्यानंतर तो घरात आला़ त्याच्याकडून बहुधा दाराची कडी अर्धवट लावली गेल्याची संधी साधून चार दरोडेखोरांनी पिंजारी यांच्या घरात प्रवेश केला़ मुस्ताक पिंजारी व त्यांच्या पत्नीला दोराच्या सहायाने बांधून ठेवत आवाज केल्यास मारहाण करण्याची धमकी देत कपाटात असलेली १२ हजाराची रोकड, महिलेच्या अंगावरील दागिने असा एकूण सुमारे एक ते दीड लाखांचा ऐवज लुटून घेतल्यानंतर पोबारा केला़
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या जोडप्याने कसे बसे स्वत:ला सावरत मुलाला झोपेतून जागे केले आणि स्वत:ची सुटका केली़ मुलाने नंतर आजुबाजूच्या लोकांना उठविले आणि त्या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़
घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविण्यात आली़ तातडीने पोलिसांचे पथक, श्वान पथक आणि ठसे तज्ञ दाखल झाले़ त्यांनी सविस्तर चौकशी करुन विचारपूस केली़ घटनेची प्राथमिक नोंद देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे़

Web Title: In Devpur, the four robbed him, tied his hands and feet and took away the loot

टॅग्स :Dhuleधुळे