विघ्नहर्त्या गणरायाला भाविकांनी दिला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST2021-09-21T04:39:53+5:302021-09-21T04:39:53+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. एकाही मंडळातर्फे यावर्षी सजीव अथवा प्रबोधनात्मक आरास करण्यात आलेली नव्हती. ...

Devotees give heartfelt farewell to Vighnahartya Ganarayana | विघ्नहर्त्या गणरायाला भाविकांनी दिला भावपूर्ण निरोप

विघ्नहर्त्या गणरायाला भाविकांनी दिला भावपूर्ण निरोप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. एकाही मंडळातर्फे यावर्षी सजीव अथवा प्रबोधनात्मक आरास करण्यात आलेली नव्हती. केवळ मोजक्या मंडळांनी विद्युत रोषणाईवर भर दिला होता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच सर्वच सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव साजरा केला.

धुळे जिल्ह्यात जिल्ह्यातील १७ पोलीस स्टेशन अंतर्गत ५०६ सार्वजनिक व ४५ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आलेली होती. दहा दिवसात टप्प्या-टप्प्याने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शेवटच्या ११ व्या दिवशी जिल्ह्यातील जवळपास ३८९ सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या दैवताला निरोप दिला.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विसर्जन मिरवणुकांना बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे दरवर्षी पाच कंदिलपासून गांधी पुतळ्यापर्यंत निघणारी मिरवणूक यावर्षी निघाली नाही.

मिरवणुकाच नसल्याने, ढोलताशे, बॅँडपथक किंवा लेझीम, डी.जे. याचा कुठलाच आवाज कुठेच ऐकू आला नाही. केवळ लहान बालकांचाच ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’एवढाच जयघोष ऐकावयास मिळत होता.

नागरिकांना घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरात ३९ भागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली होती. तसेच अनेकांनी हत्ती डोहावर मूर्ती नेत त्या ठिकाणी विसर्जन केले.

सकाळी ९ वाजेपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन होण्यास सुरुवात झालेली होती. आपापल्या भागात असलेले कृत्रिम हौदांमध्ये बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते तर मोठ्या मंडळाच्या मूर्तींचे दुपारी ३ वाजेनंतर विसर्जन करण्यात आले होते.

नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, यांनीही विसर्जनाच्यावेळी ठेका धरला होता. हिंदू एकता आंदोलनाच्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी महापौर कर्पे व अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

विसर्जनाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

Web Title: Devotees give heartfelt farewell to Vighnahartya Ganarayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.