देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:17 IST2020-03-01T13:16:56+5:302020-03-01T13:17:20+5:30

भाविकांचे श्रद्धास्थान; ६ तारखेपासून प्रारंभ, नेर येथे जय्यत तयारी सुरु

Dev Mamedar Yashwantrao Maharaj Yatraotsav | देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

dhule


नेर : धुळे तालुक्यातील नेर येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवाला ६ मार्च रोजी फाल्गुन शु ११ आमलकी एकादशीला सुरुवात होत आहे. येथे दोन मंदिरे असून जुने व नवीन अशा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते. हा यात्रोत्सव पाच दिवस चालतो. या पार्श्वभूमीवर सावता महाराज ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जय्यत तयारी सुरु आहे.
परिसरातील ही मोठी यात्रा असते. यासाठी व्यावसायिक दाखल झाले आहेत. यात्रेत आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मोठे पाळणे, ब्रेक डान्स, टोरा टोरा, मिकी माऊस, चक्री, जंपीग, क्रॉस पाळणा, ट्रायगन, मौत का कुवा, लहान रेल्वेगाडी, साखळी पाळणा, यासह विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल, संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरु आहे.
पूर्वी यात्रेतच जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. आता प्रत्येक गावात आठवडेबाजार सुरु झाल्याने व्यावसायिकांना काही प्रमाणात त्याचा फटका बसतो. मात्र, यात्रेत कमी भावात संसारपयोगी वस्तू मिळत असल्याने महिला वर्गाला त्याचे आकर्षण असते. यात्रोत्सवात गुळाच्या जिलेबीलाही मोठी मागणी असते. तसेच मिठाई, रसवंती, आईस्क्रीम, कटलरी, लोखंडी वस्तू,पाण्याचे ड्रम, जीवनावश्यक वस्तू भाजीपाला, लाल मिरची, पाळणे, थंड पाण्यासाठी मातीचे माठ, असे अनेक व्यावसायिक साहित्य दाखल घेऊन झाले आहेत.
यात्रेत लोणखेडी, अकलाड, मोराणे, देऊर, उभंड, नांद्रे, भदाणे, भटाई माता परिसर खंडलाय खु, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले शिरधाने, गुलाबवाडी आदी गावातील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात.
ही यात्रा पाच दिवस चालते. पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून तगराव मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर नदी किनारी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात येते व यात्रोत्सवास सुरुवात होते. हा परिसरातील मोठा यात्रोत्सव असतो. यासाठी बाहेरगावी नोकरी, कामधंद्यानिमित्त गेलेले नागरिक गावी परतात. नासिक, पुणे, मुंबई, गुजरात राज्यातील सुरत, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले भाविक देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी खास हजेरी लावतात.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पांझरा नदी पात्रात कुस्त्यांची दंगल होणार आहे. या कुस्ती स्पर्धेत नेर, कुसुंबा, कापडणे, धुळे, बोरीस, रामी, कावठी, भदाणे येथील मल्ल हजेरी लावतात. ग्रामपंचायतीकडून विजयी मल्लास बक्षिस स्वरुपात स्टीलची भांडी देण्यात येतात.
यात्रेत टवाळखोरांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे यशवंतराव महाराज यात्रोत्सव नियोजन समितीकडून सांगण्यात आले. तसेच कायदा सुव्यवस्था व राखण्यासाठी नेर पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे. यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच शंकर खलाणे, ग्रा.पं. सदस्य आदींनी केले आहे.

Web Title: Dev Mamedar Yashwantrao Maharaj Yatraotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे