बनावट दारुचा कारखाना उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:52 IST2020-07-01T21:51:43+5:302020-07-01T21:52:05+5:30
राज्य उत्पादन शुल्क : शिरपूर तालुक्यातील कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त

dhule
शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शिरपूर तालुक्यात केलेल्या एका कारवाईत बनावट दारुचा मिनी कारखाना उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्यासह मद्यनिर्मितीचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने शिरपूर तालुक्यातील गरताड गावात योगेश भावराव धनगर याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर अचानक छापा मारला़ पथकाने केलेल्या पाहणीत घटनास्थळी बनावट दारु तयार केली जात असल्याचे निष्पन्न झाले़
राहत्या घरात अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे सिलिंग मशीन, ४०० रुपये किंमतीचे शितपेयाचे आठ रिकामे कॅरेट आणि ४२ हजार ९०० रुपये किंमतीची बनावट देशी ब्लेंड दारुचा साठा आढळून आला़ ३५ लिटर क्षमतचे सहा ड्रम मद्यसाठ्याने भरलेले होते़ हा संपूर्ण साठा जप्त करुन योगेश भावराव धनगर याला ताब्यात घेतले आहे़ एकूण एक लाख तीन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक बी़ आऱ नवले, निरीक्षक बी़ एस़ महाडीक, थाळनेर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक ए़ ए़ रसाळ, सिमा तपासणी नाका हाडाखेडचे दुय्यक निरीक्षक के़ एऩ गायकवाड, एऩ एस़ गायकवाड, शिरपूरचे दुय्यम निरीक्षक एम़ पी़ पवार, धुळे ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक टी़ एस़ देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक एस़ पी़ कुटे, जवान अमोद भडागे, शांतीलाल देवरे, जे़ बी़ फुलपगारे, के़ एम़ गोसावी, अमोल धनगर, डी़ टी़ पावरा, गोरख पाटील, केतन जाधव, एस़ एस़ खाटीक, एम़ पी़ माळी, वाहन चालक विजय नाहीदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भरारी पथकाचे निरीक्षक बी़ आऱ नवले करीत आहेत़