धुळ्यात ओली भांग तयार करण्याचा मिनी कारखाना उदध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:01 IST2019-12-11T14:59:51+5:302019-12-11T15:01:08+5:30
पोलिसांची कारवाई : ओली भांग तयार करण्याचे साहित्यासह मुद्देमाल जप्त

धुळ्यात ओली भांग तयार करण्याचा मिनी कारखाना उदध्वस्त
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील भरवस्तीत माधवपुरा भागातील पालाबाजारमध्ये सिद्धार्थ राणा यांच्या घरात सुरु असलेला ओली भांग तयार करण्याचा आणि विक्रीचा मिनी कारखाना सुरु आझाद नगर पोलिसांनी धाड टाकून बंद केला. येथून पोलिसांनी ओली भांग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीनसह २७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आझादनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, माधवपुरा भागात एका घरात ओली भांगची विक्री केली जाते. त्यानुसार पोलिसाच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता गल्ली नंबर पाच व सहाच्या मधील बोळीत माधवपुरा परिसरात पालाबाजार येथे सिद्धार्थ राणा याच्या घरी अचानक धाड टाकली. तेव्हा घरात प्लॅस्टीक पन्नी व एका स्टीलच्या तगारीत ओली भांग विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना घर मालक सिद्धार्थ रवींद्र राणा (वय ३१ वर्ष) आणि दानिश युसुफ पठाण (वय २२ वर्ष) रा. रमापती चौक, मोगलाई, साक्रीरोड धुळे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर घराची झडती घेतली असता घराच्या एका खोलीत ओली भांग व ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम एकूण २७ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला.