इमारतीचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:50 IST2020-02-05T22:50:31+5:302020-02-05T22:50:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीमध्ये विविध विभागांच्या बाहेर भिंतींना पत्रके चिकटवून ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीमध्ये विविध विभागांच्या बाहेर भिंतींना पत्रके चिकटवून रंगरंगोटीचे नुकसान केले जात आहे़ गुटखा शौकिंनांनी इमारतीच्या भिंती रंगवून टाकल्या आहेत़ कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीचे अक्षरश: विद्रुपीकरण झाले आहे़
ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समितीला मात्र आपल्याच विभागातील स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालयच. पंचायत समितीशी सर्वसामान्य नागरीकांचा थेट संपर्क येत असतो़ शिक्षकांसोबतच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांचा संबंध येत असतो. या घटकांसाठी असलेल्या योजना, अथवा आदेश, सूचना असतात. त्या लावण्यासाठी खरे तर प्रत्येक शासकीय कार्यालयात सूचना फलक (नोटीस बोर्ड) असतो. त्यावरच संबंधित कागद लावणे अपेक्षित असते. मात्र पंचायत समितीमध्ये याउलट स्थिती दिसून येते.
नोटीस बोर्ड म्हणून भिंतीचा उपयोग होतो़ विविध सूचनांची पत्रके, योजनांच्या लाभार्थ्यांची यादी लावण्यासाठी भिंतींचा उपयोग होऊ लागला आहे. विशेष म्हणजे हे लावलेले कागद दोन-दोन वर्षांपासून तशेच आहेत. ते काढण्याची तसदीही पंचायत समितीने घेतलेली नाही.
कागदे भिंतीवर चिकटविण्यात सर्वच विभाग पटाईत आहेत़ सामान्य प्रशासन विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मात्र आघाडीवर आहेत़ सामान्य प्रशासन विभागाच्या भिंतीवर लावलेल्या विजयी उमेदवारांच्या याद्या निवडणूक होवून महिना उलटला तरी जशाच्या तशा आहेत़ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या भिंतीवर विविध जाहिराती, माहिती पत्रके आणि लाभार्थ्यांच्या यादीसह आकडेवारीची पत्रके गेली अनेक महिने जशीच्या तशी आहेत़ पत्रके चिकटविण्यात कृषी विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग देखील मागे नाही़ बांधकाम विभागाला तर स्वच्छता काय असते हेच माहीती नसल्याचे जाणवते़ तसेच पंचायत समितीच्या आवारात कुणीही रिक्षा आणि हातगाड्या पार्क करुन मोकळा होतो़ रात्रीच्या वेळी तर पार्किंगच्या जागेवर ग्रामीण भागातील अभ्यागतांसाठी ठेवलेल्या बाकड्यांवर दारुच्या मैफिली जमत असल्याची माहिती मिळाली आहे़ याठिकाणी दिवसभर सामान्य नागरीकांसह शिक्षक आणि ग्रामसेवकांची वर्दळ असते़ पार्किंगसाठी असलेल्या तळमजल्याचे बीम गुटख्याच्या थुंकीने माखले आहेत़
पंचायत समितीच्या इमारतीमधील मुतारीची तर अतीशय दयनीय अवस्था आहे़ मुतारी आणि संडास तुंबला आहे़ त्यात पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे़ अधिकारी आणि कर्मचारी या मुतारीचा वापर करतात, परंतु तिच्या दुरूस्तीचा किंवा स्वच्छतेचा शहाणपणा मात्र कुणालाही सूचत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल़
बॅनर लावून स्वच्छतेचा संदेश देणाºया पंचायत समितीच्या ‘दिव्या खाली अंधार’ असा हा प्रकार आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भिंतींचे होणारे विद्रुपीकरण थांबणार तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सन २०१५-२०१६ मध्ये पुर्ण झाले़ इमारतीच्या बांधकामाला जवळपास दोन कोटीच्या आसपास खर्च आला़ पार्किंगसह इतर सोयी सुविधांनी युक्त अशा या प्रशस्त इमारतीचे विद्रुपीकरण झाले आहे़