धुळे महापालिका बरखास्त करण्याची आमदारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:54 IST2018-05-21T16:54:56+5:302018-05-21T16:54:56+5:30
बेकायदेशिर ठराव केल्याचा आरोप, मंत्रालयात बैठक

धुळे महापालिका बरखास्त करण्याची आमदारांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेने केलेले नियमबाह्य ठराव व नगरसेवकांचे गैरवर्तन व यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याचा संदर्भ देत आमदार अनिल गोटे यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे़ विशेष म्हणजे आमदारांच्या निवेदनावर सोमवारी मंत्रालयात बैठक देखील झाली़
शहरातील सार्वजनिक जागेवर असलेली व सार्वजनिक हिताची आरक्षणे बेकायदेशिरपणे रद्द करण्याचा नवा पायंडा पाडला आहे़ मनपाने १५ मे २०१४ ला तत्कालिन उपमहापौरांचे सर्व्हे क्रमांक ५७ ब वरील अतिक्रमण नियमित करण्याचा ठराव केला, अशा प्रकारचा ठराव करणे मनपा व शासनाच्या हिताविरूध्द आहे़ एवढेच नव्हे तर शासनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता संबंधित भूखंड ३६ लाख १८ हजारात विक्रीस काढल्याचे आमदारांच्या निवेदनात नमुद आहे़ त्याचप्रमाणे ३ जुलै २०१५ रोजी अंमलात आलेल्या विकास योजनेत जयहिंद शैक्षणिक ट्रस्टच्या जागेतून १५ मीटर डीपी रस्ता जात असल्याचे नमुद आहे़ परंतु महापालिकेच्या ३१ आॅगस्ट २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नगररचना अधिनियम ६६ च्या ३७(१) तरतुदीनुसार १५ मीटर डीपी रस्ता वगळण्याबाबत मान्यता देऊन मनपाच्या हिताविरूध्द निर्णय घेतला आहे, असे आमदार अनिल गोटे यांनी नगरविकास सचिवांना १६ मे रोजी दिलेल्या निवेदनात नमुद आहे़ मनपातील सत्ताधारी पक्षाने पदाचा गैरवापर करून मनपा हिताविरूध्द केलेल्या कारवाईमुळे मनपा बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी शासनाकडे केली आहे़ त्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठकही झाली़