धुळे जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:23+5:302021-07-29T04:35:23+5:30
धुळे जिल्ह्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केले होते. केंद्र सरकारने दिलेल्या लक्ष्यांकानुसार ...

धुळे जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
धुळे जिल्ह्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केले होते. केंद्र सरकारने दिलेल्या लक्ष्यांकानुसार ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ते केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे आजही शेतकऱ्यांकडे शेकडो क्विंटल ज्वारी पडून असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्या अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील ज्वारी खरेदीबाबत वस्तुस्थिती मांडताना त्यांनी सांगितले की, मार्केटिंग फेडरेशनच्या धुळे येथील ज्वारी खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी जिल्ह्यातील ४६४३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार एकूण १ लक्ष २५ हजार क्विंटल ज्वारीची नोंदणी झाली होती. त्यापैकी लक्ष्यांकानुसार फक्त ११ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित ज्वारी खरेदी व्हावी म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करून उर्वरित संपूर्ण ज्वारी खरेदी करण्यात यावी, अशी मागणी करून ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे पत्रही दिले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारशी चर्चा करून ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.